पगाराचे 10 हजार रुपये थकवले; अकाउंटंटने मालकाचे दुकानच पेटवले, मालकाला 24 कोटींचे नुकसान
Surat Textile Market Fire: पगाराचे 10 हजार रुपये थकल्याच्या रागातून अकाउंटंटने मालकाच्या दुकानाला आग लावल्याचा आरोप.
Surat Textile Market Fire: गुजरातमधील सुरत येथील श्याम संगिनी टेक्सटाईल मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला शॉर्टसर्किट किंवा इतर कारणामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे 24 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विनोद पंडीत सावळे या अकाउंटंटचा 10 हजार रुपये पगार थकवल्याने त्याने ही आग लावल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथील विनोद पंडीत सावळे याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद श्याम संगिनी मार्केटमधील एका दुकानात अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्याला दरमहा 30 हजार रुपये पगार मिळत होता. नोकरीच्या काळात मालक आणि मुख्य अकाउंटंटकडून आपल्याला वारंवार अपमानास्पद बोलणे सहन करावे लागत असल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नोकरी सोडल्यानंतरही 10 हजार रुपये थकले होते
नोकरीतील कथित त्रासाला कंटाळून विनोदने काम सोडले होते. मात्र, त्याचा 10 हजार रुपयांचा पगार बाकी होता. थकीत रक्कम मिळावी यासाठी त्याने संबंधितांकडे वारंवार मागणी केली. मात्र, पैसे मिळत नसल्याने तसेच नोकरीदरम्यान झालेल्या अपमानाचा राग मनात असल्याने त्याने मालकाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी
पोलिसांच्या माहितीनुसार, विनोदने पेट्रोल पंपावरून 150 रुपयांचे पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत घेतले. ते बॅगेत ठेवून तो रात्रीच्या सुमारास मार्केटमध्ये पोहोचला. व्यापारी आणि कामगार परिसरातून निघून जाईपर्यंत तो पाचव्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबला.
मध्यरात्री मार्केट शांत झाल्यानंतर आग लावली
रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील वर्दळ कमी झाल्यानंतर विनोदने चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुकानाबाहेर ठेवलेल्या कापडाच्या पार्सलवर पेट्रोल ओतून काडीपेटीच्या सहाय्याने आग लावण्यात आल्याचा आरोप आहे.
कापडाचा मोठा साठा असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे मोठे लोट परिसरात पसरले आणि आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या घटनेत 24 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
आग लावल्यानंतर कुटुंबासह सुरत सोडले
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आग लावल्यानंतर विनोद मोटारसायकलवरून घरी गेला. सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचे भासेल, असे त्याला वाटत होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे स्पष्ट होऊ लागले. सीसीटीव्ही फुटेजची माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर तो घाबरला.
अंतर्गत आक्षेप, SIR आणि निर्णय प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, अंतिम निर्णय सर्वसंमतीने
त्यानंतर त्याने मोबाईल फोन बंद केला आणि कुटुंबासह सुरत सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. फरार असताना त्याने स्वतःचे सीसीटीव्ही फुटेज वृत्तवाहिन्यांवर पाहिल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
खाटूश्याम आणि अयोध्येत घेतला आश्रय
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरत सोडल्यानंतर विनोद कुटुंबासह राजस्थानमधील खाटूश्याम आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील अयोध्येत गेला. त्यावेळी त्याच्याकडे सुमारे 13 ते 14 हजार रुपये होते. काही दिवसांत पैसे संपल्यानंतर आणि प्रकरण शांत झाल्याचे वाटल्याने तो पुन्हा सुरतला परतला.
कॉकरोच जनता पक्ष आक्रमक, निवडणूक आयुक्त ज्ञानेश नवं टार्गेट, आंदोलनाची घोषणा करणार?
सुरतला परतल्यानंतर क्राईम ब्रँचने त्याचा शोध घेत डिंडोली परिसरातून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू असून, आग लावण्यामागील नेमकी पार्श्वभूमी आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.