Vantara Clarification About Madhuri : नांदणी मठातून नेलेल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीसंदर्भात वनताराने स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही जनभावनेचा आदर करतो. वनताराने ही (Madhuri) कार्यवाही स्वतःहून केली नसून आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी एक संस्था आहोत, कोर्टाच्या आदेशानुसारच आम्ही हत्तीणीची देखभाल करत आहोत, असे स्पष्टीकरण वनताराने दिले आहे.
महादेवी हत्तीणीला नेण्यात आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर वनताराने प्रसिद्धीपत्रक जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे. महादेवी (माधुरी) हत्तीणीवरील सर्वसामान्यांचे प्रेम आणि आध्यात्मिक भावना याचा आदर असून महादेवीची उपस्थिती ही केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वनताराने महादेवी हत्तीणीसंदर्भात कार्यवाही केली.
स्थलांतराच्या प्रक्रियेची सुरूवात आम्ही केली नव्हती. आम्ही फक्त न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी एक संस्था होतो, असं वनताराने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. माधुरीच्या आरोग्याचे आणि तिच्या दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणं हाच वनताराचा हेतू होता, असंही संस्थेने स्पष्ट केलं. करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून वनताराने कोल्हापूर येथील मठ आणि पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत, जेणेकरून तिच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचाही आदर राखला जाईल, असं आश्वासन वनताराने दिलं आहे.
आम्ही कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. मुक्या जीवांची सेवा करणे हेच आमचे ध्येय असून संपूर्ण प्रक्रिया जबाबदारीने आणि कायदेशीर निकषांचे पालन करूनच पार पाडली गेली आहे असं स्पष्ट करतानाच वनताराने याप्रकरणी सांमजस्याची भूमिका घेतल्याचे सांगितलं. दरम्यान, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे सीईओ विवान कर्णी आणि नांदणीच्या मठाचे स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यात दीड तास चर्चा झाली. महादेवी हत्तीला घेऊन जाण्यामध्ये वनताराचा संबंध नाही असे कर्णी यांनी सांगितल्याचं आबिटकर म्हणाले होते.
जनभावना लक्षात घेऊन हत्ती परत करायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, त्याकरीता आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. नांदणी परिसरामध्ये वनताराचे एक युनिट उभा करण्याची तयारी असल्याचेही वनताराच्या सीईओनी सांगितल्याचे आबिटकर म्हणाले होते. दरम्यान, मठाने वन विभागाची परवानगी न घेता ‘महादेवी’ला तेलंगणातील मिरवणुकीत नेल्याचा आरोप पेटा या संस्थेने केला होता. यानंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार एक समिती नेमण्यात आली आणि या समितीने 2023 मध्ये अहवाल सादर केला होता. याच अहवालाच्या आधारे हायकोर्टाने निर्णय दिला होता.