Download App

भर सभेत PM मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा तो व्यक्ती कोण? काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

हैदराबाद : भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खांद्यावर डोकं ठेवून एक व्यक्ती हमसून हमसून रडण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना 2019 मधील इस्त्रोच्या कार्यालयातील प्रसंगाची आठवण झाली. त्यावेळी भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी होत होती पण लँडिंगच्या आधीच चंद्रयानशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन इतके भावूक झाले की त्यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मिठी मारून सांत्वन केले होते. अगदी तसेच काहीसे चित्र आता पुन्हा लोकांना पाहायला मिळत आहे.

पण भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा हा व्यक्ती नेमका आहे कोण? आणि तो थेट पंतप्रधान मोदी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून का रडत होता? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

कोण आहे हा व्यक्ती?

“मंदा कृष्णा मडिगा” असे या व्यक्तीचे आहे. मडिगा हे तेलंगणातील दलित नेते असून ते मडिगा आरक्षण पोराटा समितीचे (MRPS) प्रमुख देखील आहेत. तेलंगणा निर्मितीच्या अनेक वर्षआधी आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात आरक्षण पोराटा समितीची स्थापन करण्यात आली होती. आता प्रकाशम जिल्हा तेलंगणाचा भाग आहे. आजच्या घडीला मडिगा समाज हा तेलंगणातील अनुसूचित जातीचा सर्वात मोठा घटक मानला जातो. तेलंगणातील बड्या दलित नेत्यांमध्येही मडिगा यांची गणना होते. यामुळेच त्यांना पंतप्रधान मोदींच्या सभेत व्यासपीठावर त्यांच्याच शेजारी त्यांना स्थान देण्यात आले.

Telangana Election : 35 वर्षात तब्बल 237 निवडणुका; KCR यांना टक्कर देणारा ‘इलेक्शन किंग’ कोण?

वंचित वर्ग मानला जाणाऱ्या माडिगा समुदायाचा ‘चामड्याचे काम’ हा मुख्य व्यवसाय आहे. राज्यातील एससी प्रवर्गातील आरक्षणामध्ये आपल्या समाजासाठी वेगळा आरक्षण कोटा निश्चित करण्याची मागणी मडिगा समिती गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. 2013 मध्ये मडिगा पहिल्यांदा पंतप्रधान मोदींच्या संपर्कात आले होते. मडिगा यांच्यामुळेच भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मडिगा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भाजपला विजय न मिळाल्याने ते केवळ आश्वासनच राहिले.

सभेत काय घडले?

ज्या सभेत मंदा मडिगा पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते ती सभा कृष्णा मडिगा संघटनेने आयोजित केली होती. तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत बोलताना भाजप नेते मडिगा समुदायवर झालेल्या अन्याचा पाढा भाषणात वाचत होते. त्यावेळी मडिगा यांना अश्रू अनावर झाले आणि ते हमसून हमसून रडू लागले. त्यांना भावूक झालेले बघून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे सांत्वन करत आधार दिला.

यानंतर भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकीय पक्ष आणि नेत्यांनी यापूर्वी मडिगांना केवळ आश्वासने दिली आणि त्यांचा विश्वासघात केला. पण मी त्यांच्या पापांची क्षमा मागत आहे. तेलंगणातील जनतेला सामाजिक न्यायाची हमी फक्त भाजपच देऊ शकते आणि राज्याला प्रगतीच्या सुवर्ण मार्गावर नेऊ शकते, असे आश्वासन त्यांनी दिले.

भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला 42 टन सोन्याची खरेदी; 30 हजार कोटींची उलाढाल

तसेच आम्ही न्याय मिळवून देऊ आणि न्यायालयातही तुम्हाला न्याय मिळावा, ही भारत सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत सरकार तुमचा मित्र म्हणून न्यायाच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभे राहील. मडिगाला सक्षम करण्यासाठी सर्व शक्य पद्धतींचा अवलंब करणार असून केंद्र सरकार लवकरच एक समिती स्थापन करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

follow us