Why do currency values fluctuate? : नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प म्हटलं की कर, खर्च आणि योजनांबरोबरच एक शब्द हमखास चर्चेत येतो, तो म्हणजे रुपयाची किंमत किंवा करन्सी व्हॅल्यू. अर्थसंकल्पानंतर लगेच शेअर बाजार, विदेशी गुंतवणूकदार आणि चलन बाजाराची हालचाल वाढते. कारण सरकारचे धोरण, खर्चाची दिशा, तूट आणि गुंतवणुकीविषयीचा दृष्टिकोन या सगळ्यांचा थेट परिणाम देशाच्या करन्सीवर होत असतो. मग प्रश्न हा पडतो की, रुपया मजबूत होतो म्हणजे नेमकं काय होतं?, डॉलर महाग झाला म्हणजे कोणाचं नुकसान आणि कोणाचा फायदा? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, याचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
सगळ्यात पहिले करन्सीची व्हॅल्यू म्हणजे काय, हे सोप्या भाषेत समजून घेऊयात.
करन्सीची व्हॅल्यू म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत असलेली किंमत. याच उदाहरण द्यायचं झालं तर, आज 1 अमेरिकन डॉलरची किंमत 90 रुपये असेल, तर याचा अर्थ 1 डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला 90 रुपये द्यावे लागतात. जेव्हा असं म्हटलं जातं की रुपया मजबूत झाला, तेव्हा त्याचा अर्थ कमी रुपयांत 1 डॉलर मिळतो असा होतो. म्हणजेच 1 डॉलरचा भाव 90 वरून 88 झाला, तर रुपया मजबूत झाला असं म्हटलं जातं. आणि उलट, जर 1 डॉलरचा भाव 90 वरून 94 झाला, तर अधिक रुपये देऊन डॉलर घ्यावा लागतो, यालाच रुपया कमजोर झाला असं म्हणतात. महत्वाची गोष्ट म्हणजे, करन्सीची किंमत एखादं बटन दाबल्यासारखी एका रात्रीत बदलत नाही. ती दररोजच्या मागणी-पुरवठ्यावर, देशाची आर्थिक परिस्थिती, व्याजदर, व्यापार, गुंतवणूक, महागाई, धोरणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास, या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे ठरत असते.
मग करन्सी मजबूत होते तरी कशी?
जेव्हा एखाद्या देशाच्या चलनाची मागणी वाढते किंवा त्याचा पुरवठा कमी होतो, तेव्हा त्या चलनाची किंमत वाढू लागते. ही मागणी वाढण्यामागे अनेक कारणं असतात.
-सर्वात पहिलं कारण म्हणजे निर्यात वाढणं
समजा भारतातील औषधे, आयटी सेवा, ऑटो पार्ट्स किंवा वस्त्रोद्योगाची उत्पादने जगभरात मोठ्या प्रमाणावर विकली जाऊ लागली. परदेशी खरेदीदार भारताकडून वस्तू घेताना थेट किंवा अप्रत्यक्षपणे रुपयांची मागणी करतात. भारतीय कंपन्यांना मिळणारे डॉलर, युरो शेवटी रुपयांत बदलले जातात. त्यामुळे रुपयांची मागणी वाढते आणि त्याची किंमत मजबूत होण्याची शक्यता निर्माण होते.
-दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे विदेशी गुंतवणूक
जर परदेशी कंपन्या भारतात कारखाने उभारत असतील, स्टार्टअप्समध्ये पैसा गुंतवत असतील किंवा विदेशी फंड भारतीय शेअर बाजार आणि बॉण्ड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असतील, तर त्यांना आपलं विदेशी चलन रुपयांत बदलावं लागतं. या प्रक्रियेमुळे बाजारात रुपयांची मागणी वाढते आणि रुपयावर सकारात्मक परिणाम होतो.
-तिसरं कारण म्हणजे व्याजदर आणि परताव्याचा फरक.
एखाद्या देशात व्याजदर तुलनेने जास्त असतील आणि परतावा आकर्षक वाटत असेल, तर जागतिक गुंतवणूकदार तिकडे वळतात. भारतात गुंतवणूक करायची असल्यास त्यांना आधी रुपये खरेदी करावे लागतात. परिणामी रुपयांची मागणी वाढते आणि चलन मजबूत होऊ शकतं.
-चौथं कारण म्हणजे महागाई नियंत्रणात असणं
ज्या देशात महागाई आटोक्यात असते, त्या देशाच्या चलनाची खरेदी-शक्ती टिकून राहते. बाजाराला वाटतं की हे चलन भविष्यातही स्थिर राहील. हा विश्वास वाढला की त्या चलनाची मागणी वाढते आणि किंमत मजबूत होते.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे चालू खाते तूट किंवा व्यापार तूट. जर आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल किंवा आयातीवरील खर्च नियंत्रणात असेल, तर देशातून मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर जात नाहीत. याचाच उदाहरण द्यायचं झालं तर, कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या, तर भारताचा आयात खर्च घटतो. यामुळे रुपयावरचा दबाव कमी होतो आणि तो मजबूत होऊ शकतो.
करन्सी कमजोर कधी होते?
जेव्हा एखाद्या चलनाची मागणी घटते किंवा त्याचा पुरवठा वाढतो, तेव्हा ते चलन कमजोर होतं. यामागेही अनेक कारणं असतात.
-आयात झपाट्याने वाढणं.
तेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक्स, सोने किंवा अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर आयात करावं लागलं, तर त्यासाठी डॉलर किंवा इतर विदेशी चलन खरेदी करावं लागतं. यामुळे विदेशी चलनाची मागणी वाढते आणि स्थानिक चलनावर दबाव येतो.
-विदेशी गुंतवणूक बाहेर जाणं.
जर परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून किंवा बॉण्ड्समधून पैसा काढून घेत असतील, तर ते रुपये विकून डॉलर खरेदी करतात. यामुळे बाजारात रुपयांचा पुरवठा वाढतो आणि मागणी घटते. परिणामी रुपया घसरतो. जागतिक मंदी, युद्ध, व्याजदरवाढ किंवा अनिश्चिततेच्या काळात हे चित्र जास्त दिसून येतं.
-महागाई वाढणं हेदेखील एक मोठं कारण आहे.
देशांतर्गत महागाई वाढली, तर त्या चलनाची वास्तविक किंमत कमी होते. लोकांना वाटतं की या चलनात ठेवलेली संपत्ती भविष्यात कमी मूल्याची ठरेल. त्यामुळे ते इतर स्थिर चलनांकडे वळतात आणि स्थानिक चलन कमजोर होतं.
-धोरणात्मक अनिश्चितता आणि राजकीय जोखीमही चलनावर परिणाम करतात.
सरकारी धोरणं सतत बदलत असतील, नियम अस्पष्ट असतील किंवा राजकीय अस्थिरता वाढली असेल, तर गुंतवणूकदार सावध होतात. करन्सीचा भाव हा मोठ्या प्रमाणात विश्वासावर अवलंबून असतो, आणि विश्वास डळमळीत झाला की चलन दबावात येतं.
तसंच, व्याजदर कमी होणं किंवा परतावा आकर्षक न राहणंही कारणीभूत ठरतं. जर इतर देश जास्त परतावा देत असतील, तर गुंतवणूकदार तिकडे वळतात. परिणामी स्थानिक चलन विकलं जातं आणि त्याची किंमत घटते. म्हणूनच स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवं डॉलर जर 90 वरून 95 झाला, तर डॉलर महाग झाला आणि रुपया कमजोर झाला. आणि जर 90 वरून 85 झाला, तर डॉलर स्वस्त झाला आणि रुपया मजबूत झाला.
याचा सामान्य माणसावर काय परिणाम होतो?
रुपया मजबूत झाला तर आयात स्वस्त होते, तेल, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, परदेशी शिक्षण आणि परदेशी प्रवास स्वस्त पडतो. मात्र, याचा फटका निर्यातदारांना बसू शकतो, कारण त्यांचं उत्पन्न रुपयांत कमी होतं. याउलट रुपया कमजोर झाला तर आयात महाग होते, महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो, परदेशी शिक्षण आणि प्रवास महाग होतो. पण त्याच वेळी निर्यातदारांना फायदा होतो, कारण त्यांचा माल परदेशात स्वस्त आणि अधिक स्पर्धात्मक ठरतो.
एकूणच पाहिलं तर, करन्सीची व्हॅल्यू ही काही गूढ किंवा अचानक बदलणारी गोष्ट नाही. ती डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. ज्यावर व्यापार, गुंतवणूक, व्याजदर, महागाई, सरकारी धोरणं आणि जागतिक विश्वास सतत परिणाम करत असतात. अर्थसंकल्पासारख्या मोठ्या आर्थिक निर्णयानंतर करन्सी बाजार हलतो, याचं मूळ इथेच दडलेलं असतं. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत वाटते आणि जागतिक विश्वास वाढतो, तेव्हा करन्सी मजबूत होते. आणि जेव्हा तूट, महागाई, अनिश्चितता किंवा भांडवल बाहेर जाणं वाढतं, तेव्हा चलन दबावाखाली येतं.
