Delimitation Bill : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत संसदेच्या विशेष अधवेशनाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचं काम होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी कामकाज संपणार आहे. केंद्र सरकारने अचानक केलेल्या या घोषणेमागे डिलिमिटेशन विधेयक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या विधेयकाला मंजूर करुन घेण्यासाठी सरकारने बहुमताचा आकडा प्राप्त केला असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
डिलिमिटेशन विधेयकावर सरकारला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह डीएमके सारखे विरोधी पक्ष पाठिंबा देणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे. तमिळनाडूमध्ये सध्या सत्तेबाहेर असलेला द्रमुक पक्ष या संभाव्य पाठिंबा गटात एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे. द्रमुक नेत्यांनी असे संकेत दिले आहेत की, जर तमिळनाडूच्या सध्याच्या लोकसभा जागांच्या वाट्याला (सुमारे 7.2%) कोणताही धक्का लागणार नाही, अशी खात्री मिळाली, तर ते या पुनर्रचना प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, विविध राज्यांमधील जागांची संख्या वाढवण्याबाबत सहमती घडवून आणण्यासाठी सरकार आपल्या भूमिकेत बदल करण्यासही तयार आहे. मात्र, अंतिम मसुद्याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. सध्या सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे एकूण 299 जागा आहेत. आसाममधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपच्या जागांमध्ये एक जागा वाढली आहे, तर शिरोमणी अकाली दल (SAD) पुन्हा मित्रपक्ष म्हणून सामील झाल्यामुळे आणखी एका जागेची भर पडली आहे. याव्यतिरिक्त, तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला गट (20 सदस्य) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट 6 सदस्य) देखील या गटात सामील झाले आहेत.
शरदचंद्र पवार गट विधेयकावर विचार करण्यास तयार
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशात महिला आरक्षण कायदा आणि जीएसटी (GST) सारखे अनेक कायदे सर्वसंमतीने मंजूर झाले होते. त्याचप्रमाणे मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या विधेयकाबाबतही सर्वसंमती शक्य होऊ शकते. पक्ष हे विधेयक सादर होण्याची वाट पाहील, त्यातील तरतुदींचा अभ्यास करेल आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेईल.
पाठिंब्यासाठी द्रमुकची अट
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, द्रमुकच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी असे संकेत दिले की, त्यांचा पक्ष प्रत्येक मुद्द्यावर भाजपला विरोध करण्याचे धोरण अवलंबणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, पुनर्रचनेद्वारे एकूण जागांची संख्या वाढवण्याबाबत सहमती होऊ शकते, परंतु तमिळनाडूच्या सध्याच्या लोकसभा जागांचा वाटा सुरक्षित राहणे आवश्यक आहे. डीएमकेच्या एका अन्य नेत्याने कबूल केले की केंद्र सरकारने पक्षाशी संपर्क साधला होता. त्यांनी नमूद केले की, भाजपसोबत वैचारिक मतभेद आहेत याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रस्तावाला तितक्याच तीव्रतेने विरोध केला पाहिजे. उलट, प्रत्येक विषयाचे मूल्यमापन त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर केले पाहिजे. फेब्रुवारी 2024 मध्ये, डीएमकेने तामिळनाडू विधानसभेत मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) प्रक्रियेला विरोध करणारा ठरावही मंजूर केला होता पण आता डीएमके भाजपला पाठिंबा देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभेत 360 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता
सध्या 540 सदस्यांच्या लोकसभेत तीन जागा रिक्त आहेत. राज्यघटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी किमान 360 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असेल. यापूर्वी झालेल्या अधिवेशनात, ‘संविधान (131 वी घटनादुरुस्ती) विधेयक’ लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी, विरोधी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या 230 खासदारांनी याच्या विरोधात मतदान केले होते, तर सत्ताधारी एनडीए (NDA) च्या 298 खासदारांनी याला पाठिंबा दिला होता. 11 खासदार अनुपस्थित होते.
वृषभसह ‘या’ राशींना आज होणार आर्थिक फायदा ; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सूत्रांचा दावा आहे की, यावेळी त्यांना द्रमुक (DMK), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही गटांकडून पाठिंबा मिळू शकतो. पक्षाच्या नेतृत्वाने अशा प्रादेशिक पक्षांशीही संपर्क साधला आहे, ज्यांनी यापूर्वी विरोधी पक्षांच्या बाजूने राहून या विधेयकाला विरोध केला होता. भाजपच्या एका नेत्याने दावा केला आहे की, लहान पक्षांच्या किमान सहा खासदारांचा पाठिंबा आधीच मिळवला गेला आहे आणि विधेयक अधिकृतपणे मांडल्यानंतर आणखी पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.
