EMI पेक्षा भाडं अधिक परवडतंय; तरूणांच्या ट्रेंडमुळे ‘रेंटल’ मार्केटला बूस्टर : रिपोर्ट

भाड्याच्या घरात किती दिवस? हा प्रश्न काही वर्षांपूर्वी जवळपास प्रत्येक तरुणाला ऐकावा लागायचा. मात्र आता...

Home

Home

Youth Prefer Renting Over Buying Own Home : एकेकाळी स्वतःचं घर असणं हे यशाचं आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जायचं. मात्र, आता ही मानसिकता वेगाने बदलताना दिसत आहे. विशेषतः मिलेनियल्स आणि जनरेशन-Z (Gen Z) मधील तरुण घर खरेदी करण्याऐवजी भाड्याच्या घरात राहणं अधिक पसंत करत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य, करिअरमधील लवचिकता आणि वाढत्या घरांच्या किमती यामुळे हा बदल घडत असल्याचं विविध अहवालांतून समोर आलं आहे.

EMI पेक्षा भाडं अधिक परवडतंय

रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म NoBroker च्या सर्वेक्षणानुसार, 46 टक्के भाडेकरूंनी दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहणं हा अधिक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं आहे. 25 ते 34 वयोगटातील 53 टक्के आणि 35 ते 44 वयोगटातील 48 टक्के लोक घर खरेदी करण्याऐवजी भाड्याचाच पर्याय निवडत आहेत.

याचं प्रमुख कारण म्हणजे महानगरांतील घरांच्या प्रचंड वाढलेल्या किंमती. अनेक शहरांमध्ये एका घरासाठी भरावी लागणारी मासिक EMI ही त्या घराच्या भाड्याच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक आहे. उदाहरणार्थ, ज्या घराचं मासिक भाडं 50 हजार रुपये आहे, त्याच घरासाठी महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक EMI भरावी लागू शकते. त्यामुळे लाखोंची डाउन पेमेंट आणि दीर्घकालीन कर्ज घेण्यापेक्षा तरुण त्याच पैशाची गुंतवणूक म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये करत आहेत.

गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य

20-25 वर्षांच्या कर्जात अडकण्यापेक्षा अनेक तरुण तोच पैसा म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवत आहेत. त्यांचा विश्वास आहे की, दीर्घकाळात अशा गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळू शकतो. त्याचबरोबर, नोकरी किंवा करिअरच्या संधींसाठी शहर बदलण्याचं स्वातंत्र्यही त्यांना महत्त्वाचं वाटतं. एकदा घर घेतलं की स्थलांतराचा निर्णय कठीण होतो, त्यामुळे भाड्याचं घर त्यांना अधिक सोयीचं वाटत आहे. विशेषतः आयटी, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक व्यावसायिक करिअरच्या संधींनुसार शहर बदलतात. त्यामुळे एका शहरात कायमस्वरूपी घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं त्यांच्यासाठी अधिक सोयीचं ठरत आहे.

लाइफस्टाइलही बदलली

पूर्वी भाड्याचं घर म्हणजे तडजोड मानली जात होती. मात्र आता अनेक तरुण मोठे, सुसज्ज (Furnished) फ्लॅट, गेटेड सोसायटी आणि आधुनिक सुविधा असलेल्या प्रीमियम घरांमध्ये भाड्याने राहणं पसंत करत आहेत. यामुळे महानगरांमध्ये प्रीमियम भाड्याच्या घरांची मागणीही वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) दरमहा 40 हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या घरांची मागणी लक्षणीय वाढल्याचं दिसून येत आहे.

रेंटल मार्केटला मिळतोय बूस्ट

तरुणांच्या या बदलत्या विचारसरणीचा थेट परिणाम रेंटल मार्केटवर होत आहे. मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या भाड्यात वार्षिक 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ चेन्नईमध्ये 8 टक्के, बेंगळुरूमध्ये 7 टक्के, तर हैदराबाद आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 3 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

ट्रेंड का बदलतोय?

– घरांच्या वाढत्या किंमती आणि महागडी EMI
– आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य
– म्युच्युअल फंड व शेअर बाजारात वाढती गुंतवणूक
– नोकरीसाठी वारंवार शहर बदलण्याची गरज
– हायब्रिड वर्क आणि बदलती लाइफस्टाइल
– कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची प्रवृत्ती

एकूण काय तर, एकेकाळी ‘स्वतःचं घर म्हणजे सुरक्षित भविष्य’ अशी धारणा होती. मात्र, आजच्या तरुणांसाठी ‘स्वतःचं घर’ हे आयुष्याचं पहिलं ध्येय राहिलेलं नाही. त्याऐवजी आर्थिक लवचिकता, गुंतवणूक आणि जीवनशैली यांना अधिक महत्त्व दिलं जात असून, त्यामुळे भाड्याच्या घरात राहणं हा अनेकांसाठी आता विचारपूर्वक घेतलेला निर्णय ठरत आहे.

Exit mobile version