मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांचा मुंबई रोड-शो झाला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
ते मुंबईत येऊन गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत असतील, तर त्याला आमचा आक्षेप नाही. त्यांना लोकांना भेटावे पण येथे येऊन राजकारण करू नाही. आमच्याकडे उद्योग ओरबडून नेणार असेल तर आमचा त्याला आक्षेप आहे. पण रोड शो कशासाठी ?, राजकारण करण्यासाठी आला आहात की राज्याच्या विकासासाठी आले आहात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी दाओसला जात आहे. तेथे ते रोड शो करतील का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
ते मुंबईतून फिल्मसिटी घेऊन जाणार आहेत का, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित येथून लखनऊ, नोएडा, गाजियाबाद जाऊन राहतील काय?, हे लोक तर इथेच काम करतात, असे राऊत म्हणाले.