Raju Shetti On State Prisons Scam : राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा गेल्या तीन वर्षात झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज पुण्यात (Pune) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कारागृहात सन 2023 ते 2025- 2026 या वर्षांमध्ये रेशन, कॅंन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्यात राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, राज्यातील कारागृहात कैद्याच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. रेशन व कॅंन्टीनमधून कैद्यासाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ , साखर ,डाळी , दुध , फळे ,भाजीपाला ,कांदा , बटाटा, चिकन -मटण , अंडी , बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येत आहे. यासाठी कारागृह विभाग सेंट्रलाईज पध्दतीने खरेदी करते मात्र सेंट्रलाईज पध्दतीने खरेदी करत असताना पदार्थचे दर वाढले आहे. त्याबरोबरच विद्युत उपकरणांसह अन्य काराग्रहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते.
या खरेदीमध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसू येत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे आणि सदरची खरेदी होत असताना गुणवत्तापुर्ण व उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंधनकारक होते मात्र अनेक कारागृहात नाशवंत , मुदतबाह्य , निकृष्ट , सुमार दर्जाचे ,बुरशीजन्य माल पुरवठा केल्याची तक्रार आम्ही केल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राजू शेट्टी म्हणाले.
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कारागृहात रेशन विभागात खरेदी करण्यात आलेल्या गहू, तांदूळ, साखर, मीठ , पोहे ,गुळ याच्या खरेदीमध्ये प्रतिकिलो 11 रुपयापासून ते 30 रुपयांपर्यंत जादा दराने खरेदी केले असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. याच बरोबर वेगवेळ्या प्रकारच्या डाळी, चहा पावडर सारख्या वस्तूमध्ये देखील बाजारभावापेक्षा प्रतिकिलो जादा दराने खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप देखीस त्यांनी यावेळी केला.
याचबरोबर दिवाळीचा फराळ नॅान ब्रॅडेड उत्पादकांकडुन घेण्यात आला आहे आणि त्याचे दर चितळे, हल्दीराम या सारख्या ब्रॅंडेड मालापेक्षा जास्त लावण्यात आले. मी स्वतः येरवडा कारागृहात काही दिवस काढले आहेत. मला माहीत आहे, तिथल्या चहाचा दर्जा काय असतो. जेवनाचा दर्जा काय असतो. कारागृहाच्या खरेदीसाठी सेंट्रलाईज पद्धत सुरु झाल्यानंतर हा घोटाळा सुरु झाला आहे.
अंतिम सामना रद्द झाला तर भारत की न्यूझीलंड कोण होणार विजेता? जाणून घ्या ICC चा नियम
अमिताभ गुप्ता यांच्या काळात हा सर्व गैरव्यवहार झाला आहेया गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहीजे. अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी झाली पाहीजे. अशी मागणी देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली. तसेच हा घोटाळा 400 ते 500 कोटींचा आहे असा दावा देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.