लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच, या योजनेमुळे सामाजिक योजनांना कात्री; राजू शेट्टींचा आरोप

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahaytuti) सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Scheme) जाहीर केली होती. ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली होती. मात्र, या योजनेचा फटका इतर योजनांना बसत असल्याचे बोलले जातंय. अशातच आता आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय.
तसेच लाडकी बहीण योजनेमुळे अनेक सामाजिक योजनांना फटका देखील बसला असल्याचं शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे. या योजनेमुळे अनेक सामाजिक योजनांना फटका बसलाय. सामाजिक योजनांना कात्री लावायची आणि सवंग प्रसिद्धी मिळेल, अशा योजनांच्या पाठी धावायचे अशात हे सरकार फसले आहे. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळाले नाही, असं शेट्टी म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर ४६ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळं आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या योजनांना फटका बसला. या होणाऱ्या पैशांमुळे इतर योजनांनाही कात्री लावण्याचं काम सरकारने केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना त्या आर्थिक वर्षात किती योजनांना कात्री लावली हे देखील सांगावं. म्हणजे किती सामाजिक आणि दलित योजनांना कात्री बसली, हे देखील कळेल, असा घणाघात शेट्टी यांनी केला.
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! योजनेचे नवीन निकष जाहीर…’तर’ ठरणार अपात्र
पुढं ते म्हणाले, संवेदनशील विषयांना हात घालून तरूणांची डोकी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. यातून काही पक्ष स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. या तरुणांचे चळवळींच्या माध्यमातून प्रबोधक करणे आवश्यक असल्याचंही मत शेट्टींनी व्यक्त केलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही यावेळी शेट्टी यांनी भाष्य केले. शरद जोशी म्हणायचे नेता तस्कर आणि गुंड अफसर हे सामान्य माणसाचे शत्रू आहेत. आता तशीच परिस्थिती आहे. राजकारण्यांनी गुंडांना संरक्षण द्यायचे, त्यांच्या भानगडींवर पांघरून घालायचे, यातून अमाप पैसा गोळा करायचा आणि या पैश्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवायची. यात सामान्य माणूस पिचला जातो. बीडमध्येही सध्या हेच सुरू आहे. ही व्यवस्था उखडून टाकायची असेल तर तरुणांनी या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे.