नागपूर : ‘तत्कालीन महसूल राज्यमंत्री व विद्यमान मंत्री यांनी वाशीम जिल्ह्यातील मंग्रुलपीर तालुक्याच्या सावरगाव येथे गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली.ज्यावेळेस मंत्री महोदय मंत्री पदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात करतात,त्यावेळेस अशा घटना घडणं योग्य नाही.
ह्या जमिनीचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झालेलं आहे.यात आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.अशी प्रकरणं सातत्यानं पुढे येत आहेत.या सर्व प्रकरणी महसूल राज्यमंत्री यांनी काही दलालांमार्फत गैरमार्गानं जमीन वाटपाची कारवाई केली असून यात आर्थिक गैरव्यवहार नाकारता येत नाही तमाम विरोधी पक्षाची मागणी आहे की, याप्रकरणी सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.
अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी सभागृहात महाविकास आघाडीने सभागृहात जोरदार निदर्शने केली. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या. अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को. ५० खोके एकदम ओके. सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके. वसुली सरकार हाय हाय. श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या. अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.
राज्याचे कृषीमंत्री आणि तत्कालीन सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला. एका व्यक्तीसाठी मंत्री सत्तार यांनी शासकीय निर्णयाची पायमल्ली करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी वाशीमचे श्याम देवळे, अॅड. संतोष पोफळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती श्याम देवळे यांनी दिली.