Abhijeet Dipke Detained: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळावर विमान उतरताच पोलिसांनी ही कारवाई केली. अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळे जंतरमंतरवरील नियोजित आंदोलनाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
विदेशी ताकद यांच्या पाठीशी, भारतात अराजकता…; नितीन नबीन यांचे गंभीर आरोप
विमान उतरताच पोलिसांची कारवाई
कॉकरोच जनता पार्टीने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली होती. आंदोलनाला परवाणगी नसल्यामुळे आंदोलनाच्या आधीपासूनच काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे.
अभिजीत दिपके यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर ते सकाळी मुंबईहून विमानाने रवाना झाले. त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर पोलिसांचे पथक विमानात शिरले आणि त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची समजूत काढून आंदोलनात सहभागी न होण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दिपके यांनी आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला.
‘आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार’
पोलिसांनी दिल्लीत आंदोलन करता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलन हा आपला संवैधानिक अधिकार असल्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुढे अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विमानतळावरील प्रतीक्षागृहात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी त्यांना किती वेळ ताब्यात ठेवले जाणार, तसेच त्यांना दिल्लीबाहेर नेले जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या कारवाईनंतर जंतरमंतरवरील नियोजित आंदोलन कसे पार पडणार, याकडे लक्ष लागले आहे.
ध्रुव राठीलाही ताब्यात घेतले
दरम्यान, यू-ट्युबर ध्रुव राठी यालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि सरकारी निर्णयांवर टीका करणाऱ्या व्हिडीओंसाठी ध्रुव राठी ओळखला जातो. अभिजीत दिपके आणि ध्रुव राठी यांच्याबाबतच्या या घडामोडींमुळे नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आले आहे.
आम्ही काठ्या घेऊन जंतर मंतरवर येणार; CJP च्या निवडणूक आयोगविरोधी आंदोलनाला दिलं आव्हान
मात्र, या सर्व घडामोडींबाबत दिल्ली पोलिसांची अधिकृत भूमिका आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पुढे कुठे नेण्यात आले, याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळणे आवश्यक आहे.
