Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण करणारच, असे सांगितले. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनप्रसंगी ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाचा : Ahmednagar नामांतर विषय पेटणार : चौंडी येथून निघणार यात्रा
सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर केले आहे.त्याच धर्तीवर नगरचेही नामांतर होईल. शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वात अहमदनगर शहराचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव निश्चित केले जाईल, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.
अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार? पडळकरांच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर पडळकर यांनी टीका केली. ते म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी सरकार काय करू शकते आणि काय करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही आंदोलनातून माघार घेतली होती. आता परत आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत असून या मुद्द्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
दरम्यान, नगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर या महिन्यात जिल्ह्यातून नामांतर यात्राही काढण्यात आली होती. या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये जाऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून ही मागणी लोकाभिमुख करण्यात आली. राज्य सरकार तसेच लोकप्रतिनिधीही या नामांतरासाठी अनुकूल आहेत.