Ahmednagar नामांतर विषय पेटणार : चौंडी येथून निघणार यात्रा
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर (Punyashloka Ahilya Devi Holkaranagar)करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), आमदार राम शिंदे (Ram Shinde)व आमदार महादेव जाणकर(Mahadeo Jankar) यांनी विधानपरिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतरण कृती समितीने अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गुरुवारी (ता. 9) चौंडी येथून निघणार आहे. ही यात्रा राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
चौंडी येथे गुरुवारी (ता.9) सकाळी 11 वाजता नामांतर रथयात्रेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकलोडी येथील मुख्यमानकरी खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ही नामांतर रथयात्रा कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी मार्गे अहमदनगर शहरात येईल.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर 20 फेब्रुवारीला महामोर्चाने यात्रेची सांगता होईल. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे,माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली होती. विधानपरिषदेमध्ये या मागणीला उत्तर देताना राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार हे नाव देण्यासाठी अनुकूल आहे असे उत्तर दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पोस्ट विभाग, यांना पत्र पाठवून स्थानिक पातळीवरून सहमती दर्शक ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये जाऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून ही मागणी लोकाभिमुख करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठराव. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे नामांतराला पाठिंब्याचे पत्र घेतले जाणार आहेत. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अखंड भारतातील कार्य माहितीपटाच्या माध्यमातून दाखविले जाणार आहे . तरी या नामांतर रथ यात्रेसाठी सर्व अहिल्या प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.