तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील काही दिग्गज राजकीय नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे. शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. आता ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केलेले शेलार आता बीआरएसमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर
शेलार सुरुवातीच्या काळात पत्रकार, छायाचित्रकार होते. या जनसंपर्काच्या कामात असतानाच त्यांची राजकीय महत्वाकांक्षाही होती. त्यामुळे काही काळानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र येथे काही घडत नसल्याने त्यांनी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादीनेही त्यांना सुरुवातीलाच जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली. काही काळ त्यांनी ही जबाबदारी उत्तमपणे सांभाळत आमदारकीच्या तिकीटासाठीही फिल्डींग लावली.
मात्र, राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले नाही. मग पुढे शेलारांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण, येथेही हाती निराशाच आली. पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला. पण तरीही त्यांची विधानसभेची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे काही काळ वंचित बहुजन आघाडीतही रमले. मात्र, पु्न्हा राष्ट्रवादीत येणे पसंत केले. नंतर राष्ट्रवादीनेही त्यांना 2019 मध्ये विधानसभेचे तिकीट दिले.
या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे बबनराव पाचपुते यांनी जोरदार टक्कर दिली. या अटीतटीच्या लढतीत शेलार यांचा फक्त 750 मतांनी पराभव झाला. त्यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीची तयारी शेलार यांनी सुरू केली आहे. मात्र, यंदा राष्ट्रवादी त्यांना तिकीट देईल की नाही हे निश्चित नाही. माजी आमदार राहुल जगताप स्पर्धेत असल्याने आणि त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असल्याने शेलार अन्य पर्याय शोधण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
आता पक्ष प्रवेशासाठी शेलार हैदराबादला गेले असल्याचीही चर्चा आहे. येथे ते तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतील. पक्षावर नाराज असल्याने ते कदाचित भारत राष्ट्र समितीत प्रवेश करतील अशीही चर्चा आहे. तसे घडले तर भारत राष्ट्र समितीली नगर जिल्ह्यात घनश्याम शेलार यांच्या रुपाने तगडा शिलेदार मिळेल.