Amit Thackeray : मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) सिनेट निवडणुका (Senate Elections) पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काल रात्री जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर युवासेना, मनसे विद्यार्थी सेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चांगलीच आक्रमक झाले. त्यांनी या स्थगितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरादार टीका केली. तर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकीला स्थगिती मिळाल्यावर हे बाहेर पडतात, अशी टीका आदित्य ठाकरेंवर केला.
आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिल्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घेण्यासाटी मुख्यमंत्री घाबरत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर आज सिनेट निवडणुकीच्या स्थगितीनंतर अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनविसेची भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पदवीधरांसाठी हा खूप भयानंक निर्णय आहे. पहिल्या ड्राफ्टमध्ये चुका काढल्या. त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टमध्ये देखील चुका काढून उमेदवारांना बाद केलं. यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या 12 तास अगोदर निवडणूक थांबवण्यात आली, हे चुकीचे आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नितीन गडकरींना दूर सारण्याचा कट नाही ना ? रोहित पवारांना शंका
सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उचलून धरला. त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला. तेव्हा अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी हे लपून बसतात आणि स्थगिती मिळाल्यानंतर बिळाच्या बाहेर पडतात. निवडणुकीत उतरावं. युवासेनेच्या गेल्यावेळी निवडणून आलेल्या 10 सिनेट सदस्यांनी किमान 5 कामे तरी दाखवावीत. तुम्ही कसल्या जोरावर बोलत आहात? स्थगिती मिळाल्यानंतर का बोलत आहेत? असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, ‘वातावरण कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या बाजूने आहे, हे निवडणुकीनंतर कळेल. भीती वाटत असेल तर निवडणूक पुढे ढकलणे हा पर्याय नाही. मैदानात उतरा. तुम्ही चुकीचे आहात त्यामुळे वातावरण तुमच्या विरोधात आहे. ही लोकशाही आहे, लोकांना बोलू द्या,’ असे आव्हान त्यांनी भाजपला केलं.
यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनावरही प्रश्नांची सरबत्ती केली. निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्यपाल, उच्च शिक्षणमंत्री आणि विद्यापीठाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही, ज्यांच्या हातात विद्यार्थ्यांचं आयुष्य आहे. ते निवडणुक स्थगित केल्याचं स्पष्टीकरण देत नाहीत. बोगस नोंदणी असेल तर मान्य करू. पण, बोगस नोंदणी रद्द करण्यासाठी कितीदिवस घेणार? मैदानातून पळणं हा पर्याय नाही, असं ते म्हणाले.