INDIA Meeting : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीबाबत खर्गे यांच्याशी चर्चा झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. (ashok chavan meet mallikarjun kharge regarding india meeting)
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या 2 बैठका याआधी झाल्या, आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. दरम्यान या बैठकीच्या संदर्भात आज अशोक चव्हाण यांनी खर्गे यांची भेट घेतली. संसद भवनातील खर्गे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री नसीम खान, खासदार अनिल देसाई हेही उपस्थित होते. इंडियाच्या बैठकीच्या नियोजन समितीत कॉग्रेस पक्षाने समन्वयक म्हणून अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुलींची छेडछाड करणाऱ्यांची आता गय नाही; सरकारी नोकरीतून थेट बेदखल
या भेटीची माहिती देताना चव्हाण म्हणाले, मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या तयारीची माहिती काँग्रेस अध्यक्षांना देण्यात आली. नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर खर्गे यांनीही काही सूचना दिल्या व मार्गदर्शन केलं. यापूर्वी पाटणा आणि बेंगळुरू येथे ‘इंडियाच्या’च्या बैठका झाल्या असून मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी संयुक्तपणे स्वीकारली आहे.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या सभेत 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील.
प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि उपक्रमांसाठी केंद्रीय सचिवालय स्थापन केले जाईल. चर्चा, संयुक्त मोर्चे, जागावाटप, विरोधी आघाडीच्या अशा इथर बाबींसह निवडणुक आणि राजकीय रणनीती ठरविली जाणार असल्याची माहिती आहे.