Atul Save : राज्यात सहकारी संस्थांची नोंदणी पुन्हा सुरू करू, पण त्यासाठी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांची शिफारस हवी,’ असे फर्मान सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सोडले आहे. त्यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. मंत्री सावे यांची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली असून या मुद्द्यावर सरकारवर दडपण आणत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. मात्र, यानंतरही आपण ठाम असल्याचे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील मदत केली पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
सहकारी संस्थांची नोंदणी सहकार विभागाकडे करायची असेल, तर भाजप जिल्हाध्यक्षांची अनुमती घ्यावी, असा पर्याय केला गेला. मी त्यांना केवळ मदत करण्यासाठी सांगितले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मदत केली पाहिजे. मी जे बोललो त्यात चूक काय? असा सवालही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी समर्थन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. सोसायटी स्थापनेची प्रक्रिया किचकट असून त्यात जिल्हाध्यक्षांना मी लक्ष घालण्याचे बोललो तर चुकीचे काय? शेतकऱ्यांचा विकास सहकाराच्या माध्यमातूनच होणार असल्यामुळे या संदर्भात मी बोलल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देशातील सहकार चळवळीला गती दिली. सहकारच्या माध्यमातून काम झाले पाहिजे व सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यवहार चालवता येतील. याआधी चार ते पाच गावांतील सोसायटी असायची. प्रत्येक गावामध्ये सोसायटी केली जात आहे. देशाला अनेक वर्ष काँग्रेसचे पंतप्रधान मिळाले व शरद पवार (Sharad Pawar) अनेक वर्षे कृषीमंत्री होते. तरीही साखर कारखान्यांचा आयकर माफ करू शकले नाही अशी टीका मंत्री सावे यांनी केली. मात्र, मंत्री अमित शहा यांनी आयकर माफ करून सर्वांचे मने जिंकली असे सांगत त्यांनी यामुळे पवारांचा राग असल्याचा दावा केला.