Chhagan Bhujbal meets Sharad Pawar : छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ही नक्की कशामुळे भेट झाली याची माहिती समोर आली नाही. दरम्यान, कालच नाव न घेता भुजबळांनी शरद पवारांवर आरोप केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना भुजबळांनी शरद पवारांवर मोठे आरोप केले होते. सर्व पक्षीय बैठकीवरूनही त्यांनी पवारांनाच टार्गेट केलं. त्यात ते लगेच आज पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
काय म्हणाले होते भुजबळ?
आरक्षणाचं भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावं, सगळं प्रकरण कसं शांत होईल. सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा. कारण व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र, आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होतं. मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी ५ वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप छगन भुजबळ यांनी काल केला होता.
प्रतिक्रिया काय?
आम्हीही अनेकदा पवार साहेबांना भेटलो आहोत. त्यामुळे छगन भुजबळ त्यांना भेटायला गेले असतील तर त्यामध्ये काही वावग नाही. अनेक सामाजिक, राजकीय कामं असतात. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांची भेट घेत असतात. तशीच ही भुजबळ आणि पवार भेट असेल. – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
पवार साहेबांना अनेक नेते भेटायला येतात. मात्र, अजित पवार गटातील अनेक लोकांना पवार साहेबांवर बोलता येत नाही. त्यांना जे काही बोलायचं आहे ते छगन भुजबळांच्या माध्यमातून बोलून घेतात असं मला वाटतं. तसंच, आरक्षणाचा प्रश्न केंद्रात सुटणार आहे. तर या लोकांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी आणि हा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र, त्यांच्यात इतकी हिंमत नाही. ते लोक भुजबळांच्या माध्यमातून शरद पवारांवर टीका करतात. मात्र, भुजबळ साहेब नाराज असल्याचं आम्हाला दिसतं आहे. -विद्या चव्हाण, नेत्या शरद पवार गट
छगन भुजबळ हे रोकठोक नेते आहेत. त्यांना जर काही बोलायचं असेल तर ते थेट बालतात. परंतु, मला नाही वाटत ही सहज भेट आहे. या भेटीमागे नक्कीच तस काहीतरी कारण असेल. काल बोलताना भुजबळ साहेबांनी थेट शरद पवारांचं नाव घेत टीका केली. त्यामुळे तस ते आपण मत मांडायला मागेपुढे पाहत नाहीत. परंतु, आता या भेटीचा अंदाज लावता येणार नाही. त्यावर भुजबळच सांगू शकतात – संजय शिरसाठ, शिवसेना शिंदे गट