प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
BJP : भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे. नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. गेले सात वर्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या प्रभावात बैठकी झाल्या. या बैठकांमध्ये विशेष काही घडले नाही. काही वादही दिसून आले नाहीत. एकंदरीतच सारे काही शांतच होते. यावेळच्या बैठकीत मात्र तशी परिस्थिती दिसली नाही. आज झालेली बैठक काहीशी वेगळी ठरली. या बैठकीत अनेकांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. काहींनी या बैठकीत टोमणे मारत पक्ष नेतृत्वाला सूचक इशाराही दिला. त्यामुळे दोन दिवसात बैठकांमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले तसेच भविष्यात काही आडाखे बांधले असतील तर भाजपला सावध पावले टाकावी लागतील, असे दिसत आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीवर नियोजनाची जबाबदारी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर देण्यात आली . याआधी ही बैठक नियोजनाची जबाबदारी ही स्थानिक नेत्यांकडे होती. पण त्यांना नियोजन जमणार नाही असे कारण पुढे करुन ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून गिरीश महाजन यांना देण्यात आली. महाजन यांच्याकडे जबाबदारी आल्याने अनेक नेत्यांनी बैठकीच्या नियोजनातून अंग काढून घेतले. काहींनी तर केवळ पाहुणे म्हणून हजेरी लावल्याचे चित्र होते. सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे बैठकीतून लवकर निघून गेले. पंकजाताई यांचा वावरही सावकाश असल्याची माहिती बैठकीत सहभागी सदस्याने दिली.
अॅड. आशिष शेलार यांनी हसत मनातील खदखद बोलून दाखवली. आपल्या पक्षात काय चाललंय ते कळत नाही. पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद उशिरा मिळाले. जेव्हा मिळाल तेव्हा सरकार शेवटच्या टप्प्यात होते. आता वाटलं सरकार आलं मंत्री होईल. पण काय झालं कुणास ठाऊक, परत प्रदेशाध्यक्ष केल गेलं. असो पण पक्ष आदेश म्हणून काम करतो आहे.
हाच धागा पकडच खासदार प्रीतम मुंडे यांनीही वक्तव्य केले. सरकार आलं पण कार्यकर्ता कुठे आहे ? अस सांगत टाळ्या मिळवल्या. दोन इंजिन असलेले दमदार सरकार या मुद्द्यावर देखील प्रीतम मुंडे यांनी चांगली फटकेबाजी केली. मुंडे म्हणाल्या, की सुपर ट्रेनचे इंजिन कितीही दमदार असेल ठीक आहे. पण या इंजिनला डबे नसतील तर काय उपयोग? असा सवाल केला. या वक्तव्याला कार्यकारिणीमध्ये जोरदार दाद मिळाली. कार्यकर्त्यावर देखील लक्ष दिले गेले पाहिजे. त्यांच्या मताला किंमत असली पाहिजे असे इशारेवजा वक्तव्य केले. एकूणच काय गेले अनेक वर्ष शांत राहिलेल्या भाजप कार्यकारिणीत नव्या अध्यक्षांमुळे बोलण्याला व्यासपीठ मिळाले, असाच सूर अनेक कार्यकर्त्यांमध्ये बोलताना जाणवत होता.