BJP Leader Pankaja Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसचे गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी सडेतोड भाषण केले. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली. पण आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आता आपण आपल्या नेत्यांशी चर्चा करणार, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या बंद दाराआड चर्चा देखील झाली. तसेच पंकजा यांना राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याची चर्चा देखील चालू होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सडतोड भाषण केले.
19 वर्षे झाली मी राजकारणात आहे. राजकारणात कधीकधी कीर्तनही केलं पाहिजे. मी मनात काही साठवून ठेवत नाही. स्वच्छ आणि कोरी पाटी घेऊन मी राजकारणात आले. माझ्या डाव्या बाजूला कमळात मुंडेसाहेब आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक बदल झाले. माझ्या पक्षासह सर्वच पक्षात बदल झाले. मी राजकारणात केवळ लोकांसाठी आहे. माझे शब्द ठाम असतात, असे त्या म्हणाल्या. आम्ही आमचं तोंड शिवून घ्यायचं?, बोलणं बंद करायचं? असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझ्या कुटुंबियांसाठी मी राजकारणात नाही. मला जर भूमिका घ्यायची असेल तर अशीच तुम्हाला बोलवेल व भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी बंदूक चालवावी एवढे खांदे मला भेटले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या मी विसावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘2019 मध्ये शिवसेनेशी युती केली तिथं भाजपचं चुकलंच’; विनोद तावडेंनी दिली जाहीर कबुली
3 जून 2023 पर्यंत मी जे बोलले त्या प्रत्येक भूमिकेवर मी ठाम आहे. माध्यमांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा याची संधी मी दिली नाही. अनेक लोक निवडणुका हरले त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात 2 डझन आमदार-खासदार झाले. मी त्यात बसत नसेल तर लोक चर्चा करणार. आता मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितली आहे. त्यांच्याशी मी मनमोकळे बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या.