Pankaja Munde : दोन महिन्याच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवशक्ती यात्रा काढली आहे. ही यात्रा धार्मिक असल्याचे पंकजा मुंडे या सांगत आहेत. या यात्रेला मुंडे समर्थकही गर्दी करत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे. नाशिकमध्ये यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेण्याबाबत पंकजा मुंडे यांनी एक मोठे राजकीय विधान केले आहे.
एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजपने बरोबर घेण्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, मी निर्णय प्रक्रियेत नव्हते. त्यामुळे मला याबाबत जास्त माहिती नाही. परंतु एकनाथ शिंदे यांना बरोबर घेणे हे आमच्या पक्षाची गरज होती. त्यामुळे पक्ष सत्तेत आला आहे. अजित पवारांना सत्तेत घेणे हा एक अजेंडा आहे. तो केंद्रीय पातळीवर ठरला आहे. लोकसभेला विरोधकच नसावा ही भूमिका त्यामागे असावी. अजित पवारांना बरोबर घेतल्याने विरोधक कमजोर व्हावे, हे राजकीय गणित आहे. त्याबाबत मी जास्त काही सांगू शकत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाले.
PM मोदी सुट्टी घेत नाहीत! व्हायरल होणाऱ्या चर्चांवर अखेर PMO चे शिक्कामोर्तब
अजित पवारांना बरोबर घेतल्यानंतर मतदार संभ्रमात आहे का ? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, पिढ्यानं-पिढ्या मतदार हे एका पक्षाला जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. परंतु कधी राजकीय गरजेमुळेही असे करावे लागते. याचा काय राजकीय परिणाम होईल. ते येत्या काळातच कळेल.
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भाजप नेहमी युतीमध्ये लढला आहे. तर इतर पक्षही आघाडी करून लढले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पक्ष बांधला गेला आहे. तर काही ठिकाणी पक्षाची ताकद नाही. त्याचा काही जागांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे लोक काही पक्षांना स्वीकारत नाही. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील राजकारण नेते सदृश्य आहे. गोपीनाथ मुंडे, शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांना माणणारे अनुयायी असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.