राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात; राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पारदर्शक कारवाईचा संदेश देतानाच आगामी अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि आर्थिक शिस्त राखणारा असेल, असे स्पष्ट संकेत दिले.

Untitled Design 95

Untitled Design 95

Budget session begins today : एकीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत झिरवाळ यांचा लाच प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. संबंधित प्रकरणात मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी नमूद करत, केवळ आरोपांच्या आधारावर कारवाई केली जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाऱ्या तक्रारी कोणत्या स्तरावरील आहेत, हे न पाहता तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार करताना आढळला, तर त्याच्यावर कारवाई करण्याची मुभा एसीबीला आहे, असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनातील पारदर्शकतेवर भर दिला. कार्यालयात एखादा कर्मचारी पकडला गेला, म्हणजे त्याला मंत्र्यांचा वरदहस्त आहे, असे गृहित धरणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. झिरवाळ यांच्या प्रकरणात उपलब्ध पुरावे, संभाषण किंवा कागदपत्रांमध्ये मंत्र्यांचे नाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर मंत्र्यांचे नाव समोर आले असते, तर आम्ही त्यांचाही राजीनामा मागितला असता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढली. अजितदादांनी अर्थसंकल्पाची चांगली तयारी केली होती. उत्तम आणि संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र दुर्दैवाने तो सादर करण्याची वेळ माझ्यावर आली, असे ते म्हणाले. अर्थखाते निर्धास्तपणे ज्यांच्याकडे सोपवता येईल असे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

गेले 25 -30 वर्ष अजितदादांसोबत काम केलं… एकनाथ शिंदेंना अजितदादांची आठवण

राज्य आर्थिक शिस्त पाळत जनसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल, असे संकेत देताना मुख्यमंत्री म्हणाले की, चालू योजना बंद करण्याची वेळ येणार नाही. विकसनशील अर्थव्यवस्था असल्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प मांडताना तारेवरची कसरत करावी लागते, मात्र विकासाच्या गतीत खंड पडू दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी सुचवलेले मुद्दे आणि सूचना यांचा योग्य समावेश करून सक्षम अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सहा पानांच्या आणि 18 मुद्द्यांच्या पत्रात अनेक भाषिक चुका आहेत. जागतिक मातृभाषा दिनीच मातृभाषेतील चुका केल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच, शरद पवार गटाचे आमदार बैठकीला उपस्थित नसताना एका माजी आमदाराची सही घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधक सातत्याने जनादेशाचा अपमान करत असल्याचे सांगत, सत्ताधारी पक्ष विनम्रतेने जनतेत जात असल्यामुळेच स्थानिक निवडणुकांमध्ये अभूतपूर्व विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

अजितदादांनी 12 व्या अर्थसंकल्पाची तयारी केली होती पण… सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलताना दादांची आठवण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अजित पवार यांच्या आर्थिक शिस्तीचा उल्लेख केला. अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक शिस्तीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. यंदाचा त्यांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता; मात्र अचानक ते आपल्यातून गेले. मुख्यमंत्री फडणवीस मांडणार असलेला अर्थसंकल्पही राज्याला विकासाच्या वाटेवर नेणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भावना व्यक्त करत म्हटले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हटले की सर्वांचे लक्ष अजितदादांकडे लागायचे. त्यांच्या आठवणींना श्रद्धांजली वाहूनच अधिवेशनाची सुरुवात करावी लागली. महाराष्ट्र थांबणार नाही हा त्यांचा विश्वास आप ण पूर्ण करायचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस मांडणार असलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकंदरीत, झिरवाळ प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पारदर्शक कारवाईचा संदेश देतानाच आगामी अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि आर्थिक शिस्त राखणारा असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Exit mobile version