Download App

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे गाजर आंदोलन

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज पासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु झाला. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर आज चर्चा होणार आहे. दरम्यान, विरोधक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झालेत. आज विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन विरोधकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या आहेत.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे, चुनावी जुमला असल्याचं म्हटलं होतं. तर हा अर्थसंकल्प म्हणजे, गाजर हलवा असल्याची टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आज विरोधक अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी सरसावले. विरोधी पक्षाचे नेते आज विधिमंडळात गाजर घेऊन पोहोचले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गाजर दाखवा आंदोलन केलं आहे.

यावेळी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांची टिंगल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… धिक्कार असो, पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे… झालीच पाहिजे, हलवा रे हलवा गाजर हलवा अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ नुकसानं केलं आहे. त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, अद्यापही राज्याच्या बहुतांश भागात पिकांचे पंचनाम झाले नाहीत, असं विरोधक सांगत आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातही सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यभरात कांद्याचे भाव कोसळल्यानंतर नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल, अशी राज्य सरकारने सांगितलं होतं. मात्र, अनेक ठिकाणी नाफेड अंतर्गत कांद्याची खरेदी केली जात नाही. दरम्यान, राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे आज विधिमंडळात विरोधकांना गाजर दाखवून अर्थसंकल्पाचा आणि सरकारचा निषेध केला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे गाजर आंदोलन

Tags

follow us