Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशाचत सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची ही कथित ऑडिओ क्लिप आहे. तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, चहा म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेलच, असं म्हणत धाब्यावर घेऊन जाण्याचा सल्ला बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता बावनकुळेंनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगत सारवासारव केली.
आज माध्यमांशी बोलतांना पत्रकारांनी बावनकुळेंना त्यांच्या चहापानाच्या वक्तव्याविषयी विचारले होते. त्यावर ते म्हणाले की, मी म्हटलं चुकीच्या बातम्या येऊ नये. बऱ्याचदा माहिती नसतांना पत्रकारांकडून बातम्या दिल्या जातात. तुम्ही निगेटिव्ह बातम्या छापा. पण त्यात आमचंही मत येऊ द्या. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद ठेऊन पक्षाची भूमिका सांगावी. आणि त्यात गैर काय आहे? नाहीतर एकतर्फी बातम्या छापल्या जातील. पक्षाविषयी चुकीच्या बातम्या छापल्या जाऊ नये, एवढाच माझ्या वक्तव्याचा हेतू होता. मात्र, त्याचा विपर्यास केला जातो, असं म्हणत बावनुकळेंनी सारवासारव केली.
Chandrashekhar Bavankule यांची ‘विद्वत्ता’ समोर आलीय; ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंनी साधला निशाणा
बावनकुळेंच्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार विरोध केला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बावनकुळेंनी विद्वत्ता दाखवली, भाजपने पत्रकारांचं अवमुल्यन केलं, अशी टीका केली.
पत्रकार आणि जनतेची माफी मागावी
तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत लिहिलं की, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मूलभूत सौंदर्य आहे. पण हे भाजपला मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्र हे विरोधकांचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणं हे त्यांचं काम आहे. परंतु, आवाज दाबवण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. बावनुकळेंची कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत, त्याअर्थी त्यांनी अशा स्वत: अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पत्रकारांना निर्भयपणे काम करू द्यायचे नाही हे भाजपचे धोरणच आहे.भाजपने लोकशाही व्यवस्था मान्य नाही, हे सांगावं अन्यथा, अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकार आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केला.
https://x.com/supriya_sule/status/1706162725431480496?s=20