Chhagan Bhujbal Speek On Raj Thackeray : रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवरायांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच आमदार छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार हे अनेकदा शिवरायांचे नाव हे घेत असतात. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुम्ही जर शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेतलं तर अधिक चांगलं होईल. अशा शब्दात भुजबळ यांनी राज ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळींकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहे. यातच रविवारी उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर रत्नागिरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. दरम्यान राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून टीका करण्यास सुरुवात केली. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पवार हे नेहमी शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेत असतात. मात्र ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. अशी जाहीर टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.
यावर भाष्य करताना आमदार छगन भुजबळ म्हणाले, मी शरद पवार यांच्यासोबत 1991 पासून आहे. त्यांनी आजवर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल आहे. तसेच राज ठाकरे यांनी स्वतः शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्यामध्येही त्यांनी हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले, छत्रपती ‘शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. महाराजांनी राज्यक्रांती केली. सर्वांना सोबत घेतले.
पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीत फार मोठं काम केलं आहे. म्हणून पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. तसेच दिल्लीत सगळे जण महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा लीडर असंच म्हणतात याचा अर्थ महाराष्ट्रातील नेता असा होतो. असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुम्ही जर शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेतलं तर अधिक चांगलं होईल. प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम शाहू, फुले, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं नाव घ्या, यात बिघडतं कुठं ? अशा शब्दात भुजबळ यांनी राज ठाकरे यांना शाब्दिक फटकारले आहे.