Download App

छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच… शिवेंद्रराजेंचा अजितदादांना टाेला

पुणे : राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते, असे सांगत आहे. मात्र, वर्षानुवर्षे आपण जो इतिहास वाचत आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ‘धर्मवीर’ अशीच आहे. त्यांनी धर्मासाठीच आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च आहेत, असा टाेला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भाेसले (Shivendraraj Bhosale) यांनी अजितदादांना लगावला.

धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहादसाठी कडक कायदे करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्याचबराेबर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करण्यात यावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 22) राेजी सकल हिंदू समाजाच्या वतीने लाल महल ते डेक्कन जिमखाना असा हिंदू जनआक्रोश माेर्चा काढण्यात आला. या माेर्च्याला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांनी संबाेधित केले. राज्यातील प्रत्येक शहरातून मागील काही दिवसांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातील अनेक शहरात यासाठी मोर्चे काढले जात आहे.

शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले, की ‘हिंदू समाजात जे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढण्यात येत असून त्यामुळेच प्रत्येक तालुका-शहरात मोर्चा काढला जात आहे. केंद्रात आणि राज्यात आमचेच सरकार आहे. त्यामुळे या मागण्यांचा नक्कीच विचार करुन कायदे केले जातील. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. मात्र, आमच्या धर्माचे रक्षण आम्ही करत आहोत, करणार आहाेत.

राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृ शक्तीच्या नलिनी वायाळ, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर तसेच शेकडाे गणेश मंडळाचे कार्यकर्ते या माेर्च्यात सहभागी झाले होते.

Tags

follow us