Download App

Mahrashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंचा शिरकाव, राष्ट्रवादीला दणका

  • Written By: Last Updated:

Mahrashtra Politics: पुणेः बारामती लोकसभा (Baramati Parlimantary Constituency) मतदारसंघ पवार कुटुंबाकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातील नेतेही या ठिकाणी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath Shinde) यांनी बारामतीत शिरकाव केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बारामती राजकारणात आणखी रंग भरले जाणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी, सध्याचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यात इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे यांच्यासह माजी सरपंच, इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला आहे.

या प्रवेशामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवतारे यांच्यामुळे शिंदे गटाची ताकद आहेच. त्याचबरोबर या मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचा शिरकाव होऊ लागला आहे. राष्ट्रवादीची स्थानिक फळी मजबूत आहे. त्यातील काही जण आता शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात या लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे हे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेत्यांनी पक्ष सोडणे, त्यांच्यासाठी धोक्याचे आहेत. त्याचबरोबर येथील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी एक धक्का आहे.

भाजप गेल्या काही वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग करत आहे. पवार कुटुंबाविरोधात तगडा उमेदवार देणे, पवार कुटुंबाविरोधात आक्रमक प्रचार करणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान भाजपकडून दिले जात आहे. भाजपचे केंद्रातील नेते, राज्यातील नेते हे बारामतीमध्ये येऊन हा मतदारसंघ पवारांकडून हिसकाविणार अशी भाषा वापरतात. एकीकडे या मतदारसंघात भाजप आपली ताकद वाढवित असताना शिंदे गटाकडून आता या मतदारसंघात ताकद वाढविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात येथील राजकारणात वेगळेच रंग भरले जाणार असल्याचे यातून दिसून येत आहे.

Tags

follow us