Nanded Farmer Couple To Attend Funeral Of Their Son : दूरदेशी दुबईत गेलेल्या मुलाचा अचानक झालेला मृत्यू तीन दिवसांनंतर समजला अन् शेतमजूर दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला . कोणाकडे मदतीची याचना करावी हेच समजेनास झाले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ एका एसएमएसवर हे समजले त्यांनी दिल्लीपासून ते दुबईपर्यंत सूत्रे हलवली. सतत पाठपुरावा केला. स्वत: खर्च करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
दुबईला नोकरीसाठी गेला, अन्…
श्याम अंगरवार हा केवळ सत्ताविशीतील तरुण. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील या भागातील अनेक जण दुबईला नोकरीसाठी जातात. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतमजूर असलेल्या आईवडलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी श्यामही कामगार म्हणून दुबईला गेला. इमाद नावाच्या कंपनीत कामास होता. पण दुसरी चांगली संधी खुणावत होती. त्यामुळे त्याने ही कंपनी सोडली (CM Devendra Fadnavis) होती.
मृत्यूची बातमी तीन दिवसांनंतर
25 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस झाला. सगळे कसे आनंदात सुरू होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तापाचे निमित्त झाले. दुबई येथील एनएमससी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, एक ऑक्टोबर रोजी श्यामचा मृत्यू झाला. इकडे किनवटमध्ये त्याच्या आई वडिलाना काही कल्पनाच नव्हती. लाडक्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना तीन दिवसांनंतर चार ऑक्टोबरला समजली. काय करावे समजेना. मदत तरी कोणाला मागायची? दु:खात बुडालेल्या या शेतमजूर दांपत्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या गोवर्धन मुंडे यांना समजली. त्यांनी पाच ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना एक एसएमएस (मेसेज ) करून त्याची माहिती दिली.
मंत्रालयाशी सतत पाठपुरावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैशिष्ट्य म्हणजे येणारा प्रत्येक एसएमएस (मेसेज ) ते पाहतात. एका शेतमजूर आई-वडिलावर आलेल्या या दुःखद प्रसंगाची माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री हेलावून गेले. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व तपशील दिले. पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूत्रे हलविली जाऊ लागली. मृत्यूच्या दाखल्याचा प्रश्न होता. परराष्ट्र मंत्रालयाशी सतत पाठपुरावा केल्यावर दाखला मिळाला.
मुख्यमंत्री देवासारखे धावून आले…
मुख्य प्रश्न होता की, एका गरीब कामगाराचे पार्थिव आणणार कसे? त्यासाठीचा खर्च कोण करणार? पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वैयक्तिक पातळीवर खर्च करण्याची तयारी दर्शविली. मग परराष्ट्र मंत्रालयालाने खर्च करण्याचे मान्य केले. श्याम अंगीरवार यांचे पार्थिव रविवारी मध्यरात्री 12 ऑक्टोबर रोजी दुबईवरून विमानाने हैद्राबाद विमानतळावर आणण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तेथून पुढची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले होते . नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने श्यामचे पार्थिव किनवटपर्यंत पोहोचविले. रविवारी 12 ऑक्टोबरला श्यामचा अंत्यविधी झाला. या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री देवासारखे धावून आल्याने या गरीब दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन तरी मिळू शकले.