Nanded Hospitals death: आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच; वडेट्टीवारांचा आरोप
Vijay Wadettiwar : काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) एकाच दिवसांत 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच असल्याचा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार बुधवारी नांदेडमध्ये आले होते. दुपारी त्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले, शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एकाच दिवसात २४ मृत्यू झाल्यानंतर सरकार यातून काही बोध घेईल आणि सुधारणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने अनास्था दाखवली. त्यामुळे रुग्णालयात आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच आहेत, असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या स्वातंत्र्याची ‘चिरफाड’; अटकेच्या अधिकारांबाबत नवी मार्गदर्शक तत्वे
वडेट्टीवार म्हणाले, हाफकिनकडे करोडो रुपये देऊन ठेवले होते. मात्र त्यांनी औषध खरेदी केले नाही. त्यामुळे प्राधिकरण नेमण्यात आलं. परंतु, त्यांच्याकडूनही गेल्या आठ महिन्यांपासून औषधी आळी नाही. रुग्णालयाने स्थानिक स्तरावर 70 लाख रुपयांची औषधे खरेदी केली होती. मात्र लाखो रुग्णांना ही औषधं कशी पुरवणार? असा सवाल त्यांनी केला. ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. मुंबईतून तीन वेळा सफाई कामगारांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. मंत्र्यांकडूनही दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत. धादांत औषधांचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे, असं ते म्हणाले.
कळव्यातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप आलेला नाही. नांदेडच्या बाबतीतही तेच होणार आहे. मात्र आम्ही त्यांचा पर्दाफाश करू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत द्या
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नांदेडला यायला वेळ नाही. कारण ते दिल्लीत पळतात. दोन दिवस उशीरा दिल्लीत गेले असते तर काय फरक पडला असता? पण लोक मरू दे, आम्ही आमचे राजकारण करू! ही त्यांची भूमिका असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची मागणी केली.
उद्या सुनावणी
दरम्यान, आता मुंबई उच्च न्यायालयाने शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूची दखल घेतली. या प्रकरणी कोर्टाने सु-मोटो याचिका दाखल केली असून उद्या त्यावर तातडीने सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.