T20 World Cup-झिम्बाब्वेवर मोठा विजय; भारत सेमीफायनलच्या रेसमध्ये
India beat Zimbabwe-या लढतीत 72 धावांनी दणदणीत विजय मिळविल्याने भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आला आहे.
India beat Zimbabwe : टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup9 सुपर आठमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाने (India) झिम्बाब्वेविरुद्ध ( Zimbabwe) जोरदार कामगिरी करत मोठा विजय मिळविला आहे. झिम्बाब्वेसमोर 257 धावांचे विशाल लक्ष्य भारतीय संघाने दिले होते. परंतु झिब्बाब्वे संघ 6 बाद 184 धावा करू शकला. या लढतीत 72 धावांनी दणदणीत विजय मिळविल्याने भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आला आहे. आता वेस्ट इंडिजला हरवून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये धडक मारेल. आजच दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून सेमीफायनल गाठली आहे.
ब्रायन बेनेट एकटा झुंजला…
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेची दोन फलंदाज झटपट बाद झाले. पण कर्णधार सिंकदर रजा आणि ब्रायन बेनेट या जोडीने 41 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. सिंकदर रजा 31 धावांवर बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. त्यानंतर रयान बर्लला हा अर्शदीप सिंगने शून्यावर बाद केले. सलामीवीर ब्रायन बेनेटने 59 चेंडूत 97 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत सहा षटकार आणि आठ चौकारांचा समावेश आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, शिवम दुबेने यांनी एक-एक विकेट घेतली.
भारताचा धावांचा डोंगर
भारतीय संघाने आज आक्रमक खेळी करत 4 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसनने सलामीला येत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 15 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्यात दोन षटकार आणि एक चौकार होता. आतापर्यंत अपयशी ठरत असलेल्या अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 30 चेंडूत 55 धावा कुटल्या. तर हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकविले. तिलक वर्माने नाबाद 44 धावा केल्या. ईशान किशनने 38 आणि सूर्यकुमार यादवने 33 धावांची खेळी केली.
17 षटकार मारले
या लढतीत भारतीय फलंदाजांनी तब्बल 17 षटकार मारले. टी-वर्ल्डकपमध्ये एका डावात हे सर्वाधिक षटकार आहेत. या वर्ल्डपमध्ये भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत 63 षटकार खेचले आहेत. हा एक विक्रम आहे. 2024 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने 61 षटकार मारले होते. या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने सर्वाधिक 66 षटकार मारले आहेत.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताची सर्वोत्तम धावसंख्या
टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर वर्ल्डकपमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघ इतिहास रचण्यास पाच धावा दूर राहिला आहे. सर्वाधिक धावांचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. 2007 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध 260 धावा केल्या आहेत.
