एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते! दलवाईंचा दावा, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र पक्षातील काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश रोखला असा खुलासा केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र पक्षातील काही नेत्यांनी त्यांचा प्रवेश रोखला, असा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दाव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती, असा महत्त्वाचा खुलासा केला आहे. मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.
शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत विचारलं असता चव्हाण यांनी हा नवीन विषय असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती. मात्र काय चर्चा झाली ते सांगणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळं दलवाई यांनी केलेल्या दाव्याला चव्हाण यांच्या वक्तव्यामुळं काही प्रमाणात पुष्टी मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे आजही आपले मित्र असल्याचं सांगताना चव्हाण म्हणाले की, ते आमचं काम करत नाहीत, मात्र आजही आमचे मित्र आहेत. ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या. मात्र त्या भेटींमध्ये नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत आपण बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवरही सविस्तर भाष्य केलं. 13 ऑक्टोबरला मुंडे यांची भेट झाली होती. त्यानंतर 18 ऑक्टोबरला आपण दिल्लीला जाऊन सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत बैठक घेतली होती, असा दावा चव्हाण यांनी केला. या बैठकीला माणिकराव ठाकरे साक्षीदार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आपल्याला निवडून येणं अवघड होईल, तसंच नागपूरमधील दोघं नेते आपल्याला त्रास देतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली होती, असं चव्हाण यांनी सांगितलं. त्यामुळं गोपीनाथ मुंडेंनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनेही महाराष्ट्राच्या राजकारणातील जुन्या घडामोडींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.