Eknath Shinde : धाडसी निर्णय वेळेनुसार घ्यावे लागतात. मी देखील दीड वर्षांपूर्वी असाच निर्णय घेतला होता. मी डॉक्टर नाही पण दीड वर्षांपूर्वी मोठे ऑपरेशन नक्कीच केले. एक टाका सुद्धा लागला नाही. काँग्रेससोबत तुम्ही बराच काळ काम केले आहे मी पण सेनेत काम करत आहे आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्ही (मिलिंद देवरा) वयाच्या २७व्या वर्षी खासदार झालात उच्चशिक्षित आहात. काळानुरूप बदल होतात एक अभ्यासू आहात त्याची देशाला गरज आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत स्वागत केले.
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. शिंदे पुढे म्हणाले, राज्यातील जनता सुज्ञ आहे, काही लोक (उद्धव ठाकरे) काल कल्याण येथे बोलले की आता निवडणुकांमध्ये साफ करायचे आहे. त्यांना मला सांगायचे आहे रस्ते धुणारे आणि रस्ते साफ करणाऱ्यांना कुणाची साथ आहे.
माझ्यासाठी निर्णय घेणं सोपं नव्हतं पण.. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत देवरांनी सांगितली ‘अंदर की बात’
प्रत्येक पावसात रस्ते खराब होतात तरी कसे आजवर किती पैसे खर्च झाले तर अधिकारी म्हणालेत साडेचार हजार कोटी फक्त दुरुस्तीवर खर्च झालेत. मग मी निर्णय घेतला आता सिमेंटचेच रस्ते बनतील. देवराजी तुमच्या सारखे व्हिजनरी लोक आमच्या सोबत येतील तेव्हा मुंबईत आणखी उद्योग नक्कीच येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मी देखील जमिनीवर उतरून काम करतो. ऑफिसमध्ये बसून राज्याला पुढे नेऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक दौरे केले आहेत असे म्हणत शिंदेंना ठाकरेंना टोला लगावला.
आजच्या काँग्रेसचा फक्त मोदीविरोध – मिलिंद देवरा
देवरा म्हणाले, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांचे मला फोन आले. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेताय असे विचारले. खरंतर माझ्या वडिलांच्या वेळची काँग्रेस आणि आताची काँग्रेस या दोन्ही काँग्रेसमध्ये मोठा फरक आहे. मी कधी काँग्रेस सोडेन असं मला वाटलं नव्हतं.पण, आज मी काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिले आहे. मुख्यमंत्री शिंदे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे.