देशाच्या राजकीय पटलावर जवळपास 60 वर्षे काँग्रेसने (Congress) सत्ता गाजवली. राज्यातही जवळपास 50 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचेच निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसचीही आजवरच्या निवडणुकांमधील ही निच्चांकी आमदारांची संख्या आहे. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. (Congress failed to win a single seat in 21 districts in the assembly elections.)
सहा महिन्यांर्पू्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नसिम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे.
धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. ज्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने सहकार रुजवला आणि वाढवला तिथे पाच जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला पलूस-कडेगाव ही एकमेव जागा मिळाली आहे. पण तिथेही विश्वजित कदम यांचे मताधिक्य थेट तीस हजारांवर आले आहे. गत विधानसभा निवडणुकीत हे लीड 1 लाख 71 हजार मतांचे होते.
पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला नेहमी यश मिळत असे. पुणे जिल्ह्यात पक्षाला भोपळा फोडता आला नाही. सोलापूर जिल्ह्यातही काँगेसची पाटी कोरी राहिली. अखंड उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे. तर विदर्भात नऊ आणि मुंबईत तीन जागांवर यश मिळाले आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अवघ्या 208 मतांनी निवडून आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नवापूर मतदारसंघातून शिरीषकुमार नाईक हेही अवघ्या 1100 मतांनी निवडून आले आहेत.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षाच्या कामगिरीची घसरण का झाली, याबाबत चर्चा सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थाने याची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतरच झाली होती. आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेली आडमुठी भूमिका, न झालेले व्होट ट्रान्सफर अशा मुद्द्यांवर येऊन झाला.
लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता या पक्षाने निचांक गाठला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाची पदे मिळाली. त्यामुळे ते पक्षात नशीबवान समजले जात होते. पण आता त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेसचा हा पहिला मोठा पराभव आहे. एकूणच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक मानली जाते.