Download App

Harshwardhan Sapkal : ‘शेतकऱ्यांवर अस्मानी संकट अन् सुलतानी सरकार झोपलंय’

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलं असल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारचं लक्ष वेधलंय.

Harshwardhan sapkal : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलं असल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधलंय. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना आता पुन्हा संकट आलंय. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, सरकारने तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणीही सपकाळ यांनी यावेळी केलीयं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

विखे-थोरातांची तशी जुनीच पण नवी इनिंग, कारखान्याचा कारभार घेतला हातात; राजकारणही होणार गोड..

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी १ रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारीत नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योजना राबवली पाहिजे पण सरकारने योजनाच रद्द केली. १ रुपयात पीक विमा योजना ही पुन्हा लागू करावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सपकाळ म्हणाले आहेत.

खरीपासाठी सरकारची तयारी नाही…
खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. बि बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतक-यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे खते बियाणे लिंकिंग करून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते पण कारवाई काही करत नाही. आतातरी सरकारने जागे व्हावे व लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

जियो जोमात आयडीया-बीएसएनएल कोमात, एअरटेलचीही भरारी; ग्राहकसंख्येचा रिपोर्ट मिळाला

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणे असंवैधानिक…
भाजपा युती सरकारचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी या सरकारने लाडकी बहिण सारख्या योजनांसाठी वळवला हे असंवैधानिक आहे. दलित, आदिवासी, ओबीसी समाजासाठी असलेला निधी सरकारने वळवला आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. यासंदर्भात महामहिम राज्यपाल यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. योजनांसाठी निधी नाही हे चित्र राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे द्योतक आहे. राज्य सरकारकडे निधी नसेल तर फडणवीस, शिंदे व अजित पवार यांनी केंद्राकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणून लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असेही सपकाळ म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत..
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवावी यासाठी सर्व देश एकजूट झाला होता. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडत असताना अचानक शस्त्रसंधीचा निर्णय घ्यावा लागला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपले जवान शर्थीने लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली? भारत पाकिस्तानमध्ये अमेरिका मध्यस्थी करत आहे का? तसे असेल तर शिमला करार रद्द केला आहे का? डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जाहीरपणे सांगितले ते भारत सरकारला मान्य आहे का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला सरकारने द्यावीत, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. सर्वपक्षीय बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते, त्यामुळे जनेच्या मनात शंका आहेत, त्यांचे समाधान करावे, असेही सपकाळ म्हणाले..

२१ मे रोजी काँग्रेसची राज्यात तिरंगा यात्रा..
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच महात्मा गांधी ते पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी २१ मे राजी राज्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

शरद पवार यांची सदिच्छा भेट…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार हाती घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली नव्हती. आज त्यांची वेळ घेऊन भेट घेतली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ५० वर्षांचा मोठा अनुभव आहे. ही सदिच्छा भेट होती असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

follow us