Nana Patole on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये (BJP) नाराज असल्याची सतत चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत फूट पडलेला गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. तेव्हा पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोठं विधान केलं. पंकजा मुंडे लवकरच भाजपमध्ये मोठा स्फोट घडवणार असल्याचा दावा त्यांनी केला.
नाना पटोले हे गोंदियाच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना भाजपमध्ये मोठी अंतर्गत खदखद असल्याचा दावा केला. याप्रकरणी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य केले. मी गेली चार वर्ष धैर्य सांभाळून आहे. महाराष्ट्रात माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही आणि मी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही गोष्टीत नाक खूपसत नाही, अशा नाराजीच्या सूरात पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केल होती. भाजपमध्ये काय चालले आहे ते मला माहीत नाही. मात्र आगामी काळात भाजपमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे स्पष्ट झालं, असं पटोले म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विशेषत: भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट; सर्वेक्षणातून ‘जोर का झटका’
सध्या वादळापूर्वीची शांतता
सध्या भाजपमध्ये वादळापूर्वीची शांतता आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन दीड वर्ष झाले. त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं नाना पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील भाषणाचीही आठवण करून दिली.
भोपाळमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीच्या पाटबंधारे आणि विमान वाहतूक मंत्रालयातील घोटाळ्याचा उल्लेख केला. हा सुमारे 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबईला केंद्रशासित बनवण्याचे भाजपचे कारस्थान
विदर्भ राज्य वेगळे करून मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये हलवण्याचा भाजपचा डाव असल्याचेही नाना पटोले म्हणाले. केंद्राला संसदेच्या अधिवेशनाची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी नव्या संसदेत केवळ ५ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र त्यांचा एकही अजेंडा खासदारांना सांगण्यात आला नाही. या अधिवेशनामुळे कदाचित भारताची फाळणी होऊ शकते किंवा आगामी काळात स्वतंत्र विदर्भ राज्य अस्तित्वात येऊ शकते. मात्र हे सर्व विदर्भाच्या भल्यासाठी नसून मुंबईला केंद्रशासित बनवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचं पटोले म्हणाले.