Assembly Session : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असणार? आता पुढचा विरोधी पक्षनेता कोण? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला तर काहींनी चिमटे काढल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी विरोधकांना सज्जड दम भरला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, 1999 साली छगन भुजबळही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी ते एकटेच होते. त्यांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. मी छगन भुजबळांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे. त्यामुळे आता पहिल्याचं बाकावर बसलेल्यांपैकी अनेकांनी चिमटे काढले आहेत, ही परंपराचं असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच पहिल्या बाकावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडून इतरांनी चिमटे काढलेत, ते सत्तेतून नेहमीच इकडे तिकडे राहिलेले आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र बघतच आहे. त्यामुळे आता त्यांनी चिमटे काढण्याच्या भानगडीत पडून नये, या वडेट्टीवारला कुठेही न्या घाबरणार नसल्याचं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं आहे.
गडचिरोलीत वडेट्टीवारांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं आहे. त्यावेळी सोबत असलेल्या तरुणांमध्ये कसलीच भीती नव्हती. सर्वसामान्यांची गरीबी मी अनुभवली आहे. आज मला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या अधिकाराचा वापर प्रमाणिकपणे केला आहे. लढण्यासाठी संख्याबळ नाहीतर सामर्थ्य आणि प्रमाणिकपणा लागतो, अनेक दिग्गज नेत्यांची परंपरा विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीला लाभलेली आहे, पण सध्याच्या राजकारणात द्वेष वाढल्याचं दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Nitin Desai Death : देसाईंच्या आत्महत्येला कारणीभूत कोण? शेलार, लाड यांचे सभागृहात गौप्यस्फोट
सत्ताधाऱ्यांच्या मागे बसलेल्या मंडळींकडून विरोधकांच्या प्रश्नाला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच मागची मंडळी आमच्या प्रश्नावर डावलण्याचा प्रयत्न करतात ते लोकशाहीला, परंपरेला, उद्याच्या पिढीला घातक असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर विजय वडेट्टीवारांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे. आता यापुढे सत्ताधारी विरोधकांमध्ये नक्कीच समन्वय साधता येणार असल्याची अपेक्षाही नार्वेकरांनी यावेळी व्यक्त केली आहे.