Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही असे आता दिसू लागले आहे. भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असताना यात धुसफूस वाढू लागली. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेली टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड भांबावलाय, पागलासारखा झालाय. तो काय बोलतो ते त्यालाच कळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली. ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला आणि 90 टक्के आमदारांना निधीच मिळाला नाही. त्यांचा रोख विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडेच होता. कारण, या नेत्यांना सरकारकडून मोठा निधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यांच्या या वक्तव्याचा वडेट्टीवार यांनी मात्र चांगलाच समाचार घेतला. आव्हाड यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली.
जितेंद्र आव्हाड भांबावलाय, पागलासारखा झालाय. तो काय बोलतो ते त्यालाच कळत नाही. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षातील जयंत पाटील, राजेश टोपे यांना किती निधी मिळाला यावर बोलावं. विरोधी पक्षनेत्याला एकट्यालाच निधी मिळाला नाही. तो काय बोलतो त्याच त्यालाच कळेना. भांबवला आहे. तो पागलासारखा झालाय. आम्ही कुणाला पैसे मागितले नाहीत.
आव्हाड यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप करावेत. आमच्यावर कशासाठी करता. आम्ही कु्णाच्याही दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. बाकीच्या आमदारांनी प्रस्ताव पाठवला तसाच आम्हीही पाठवला होता. आता त्यांना (सरकार) वाटलं विरोधी पक्षाला निधी द्यावा त्यांनी दिला. याआधीही असंच व्हायचं, असे वडेट्टीवार म्हणाले.