मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मंत्री दावे-प्रतिदावे करत आहेत. काल महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या आक्रमकपणा विरोधात विधानसभेत ठराव समंत केला. ठरावानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे यांच्या याच मागणीविरोधात कर्नाटक सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी सीमाप्रश्नावरून कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ्य नारायण यांनी मुंबईत 20 टक्के कानडी नागरिक असल्याचा जावईशोध लावत मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करत महाराष्ट्राला डिवचले आहे.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करणारे मंत्री मुर्ख आहे. अगोदर सीमाभाग केंद्रशासित होईल, कारण मुंबईत कानडी भाषिकांवर अत्याचार होत नाहीत.