राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्ष कुणाची मते खातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यामुळे आधीच्या निवडणुकीमध्ये कुणाला फायदा झाला, याचा अभ्यास लोकांनी करण्याची गरज असल्याचे पवारांनी म्हटले आहे. जर काही पक्ष फक्त मत खाण्यासाठी व मत विभागण्यासाठी पुढे येत असतील तर त्याचा धोका लोकशाहीला होऊ शकतो, अशी टीका पवारांनी केली आहे. तसेच या पक्षांनी मत खाण्यापेक्षा कार्यकर्त्यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी केली आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये अद्याप वंचितचा समावेश झालेला नाही. सध्या पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा दिला आहे.
(अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा)
याआधी 2019 च्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या दोन पक्षांची युती होती. या निवडणुकीत या दोन पक्षांनी मोठ्या प्रमाणावर मते घेतली होती. पण त्यांची फक्त औरंगाबादची जागा निवडूण आली होती. यावरुन रोहित पवारांनी वंचितवर टीका केली आहे.