Download App

‘शिंदे, मी, अजितदादा, भुजबळ अन् विखे पाटील…’; पाच नेत्यांचा संदर्भ देत फडणवीसांच्या वडेट्टीवारांना शुभेच्छा!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेमध्ये शिंदे साहेब, मी, अजित दादा, भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब जे सगळे एकत्रितपणे पहिल्या रांगेत बसलेले आहेत, आपणही त्याच रांगेत अर्थात उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये बसावं, आपलं देखील नाव यावं असं म्हणतं असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना खोचक शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांच्या या खोचक शुभेच्छांनंतर सभागृहात एकच हशा पिकला होता. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated the newly appointed Leader of Opposition Vijay Wadettiwar)

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. या भाषणात फडणवीस बोलत होते.

9 वर्षात 4 विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी गटाचा हात धरला :

महाराष्ट्र विधानसभेच्या मागील नऊ वर्षात चार विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी गटाचा हात धरला आहे. एकनाथ शिंदे हे 2014 विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी 42 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे आली. काँग्रेसकडून या पदावर राधाकृष्ण विखे-पाटील यांची वर्णी लागली. ते चार वर्ष या पदावर होते. मात्र त्यानंतर त्यांनीही शिंदेंप्रमाणे जुन 2019 मध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

अजितदादांनी हाताला धरून खुर्चीत बसवलं, शिंदेंच्या कोट्यांनी सभागृह हसलं; वडेट्टीवारांचं सत्ताधाऱ्यांकडून हटके अभिनंदन

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावे लागेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते देण्यात आले. पुढे अडीच वर्षांनंतर शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदेंनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. मात्र वर्षभराच्या कालावधीच पवारांनीही राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

“आता तिकडे जाऊ नका, परत इकडेच या”

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही वडेट्टीवार यांना अत्यंत खोचक पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांच्या जागेवर जात असतानाच “आता तिकडे जाऊ नका, परत इकडेच या” असं म्हणत पाठीमागून महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा ऐकताच अजित पवार यांनाही हसू आवरता आलं नाही.

follow us