अजितदादांनी हाताला धरून खुर्चीत बसवलं, शिंदेंच्या कोट्यांनी सभागृह हसलं; वडेट्टीवारांचं सत्ताधाऱ्यांकडून हटके अभिनंदन
Leader of Opposition : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात घेतलेली फिरकी, विरोधकांना मारलेले शाब्दिक टोलेही सभागृहात हशा पिकवून गेले.
संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…
काँग्रेस पक्षाचे आमदार जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांची नियुक्ती पक्षाने केली होती. त्यानंतर पक्षाने कालच विधानसभेचे अध्यक्ष राहु नार्वेकरांना पत्र देत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज नार्वेकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेत वेगळेच चित्र दिसले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसतमुखाने हस्तांदोलन करत वडेट्टीवार यांना थेट विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर नेऊन बसवले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना जोरदार भाषणच केले. त्यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले. शिंदे म्हणाले, वडेट्टीवार यांनी लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. मतदारसंघात जनाधार वाढवला. त्यानंतर लोकांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत निवडून देत त्यांच्या कामाची पोचपावती दिली. अनेक खात्यांची जबाबदारी पार पाडली. जिथे संकट आले तिथे आपण धावून गेलात.
विजयभाऊ वर्क फ्रॉम होम नेते नाहीत
विजय भाऊ वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत. ते तसच काम करतात. शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांच्या अडचणी समजत नाही. रस्त्यावर उतरायलाही हिंमत लागते. समोर यायचं असतं. लपायचं नसतं. तो गुण विजयराव तुमच्यात आहे. त्यामुळे मला तुमच्याबद्दल आपुलकी आहे, असे म्हणत शिंदे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
विदर्भाचा पाहुणचार खास
वडेट्टीवार हे विदर्भातील नेते आहेत. आमचे उपमुख्यमंत्रीही विदर्भातील आहेत. विदर्भाच्या पाण्याचा एक वेगळा गुण असतो. त्यामुळे महाराष्ट्राला आजवरच्या इतिहासात विदर्भातून चार मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाच्या सुनेला देशाचं राष्ट्रपतीपद मिळालं. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हात कुणीही धरू शकत नाही. तिथे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे सगळे ऋतू कडक असतात. विदर्भातलं जेवणही कडक असतं, असं शिंदे म्हणताच सभागृहातील सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिलं.