पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमच्या निमित्ताने आज पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत आहेत. जवळपास दिवसभर हे नेते या शहरात असल्याने चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करूनच जाणार का, अशी चर्चा दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात सुरु होती.
आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने या मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून या पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. बूथ पातळी, संपर्क कार्यालयापासून कोणाला कोणती जबाबदारी द्यायची अशी रणनीती आखली जात आहे. अशातच आज दिवसभर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘इंद्रायणी थडी’च्या निमित्ताने तर पोटनिवडणूक पूर्व तयारीच्या निमित्ताने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही शहरात आले आहेत. त्यामुळे कार्यक्रम हे निमित्त आहे. देवेंद्र फडणवीस हे चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करूनच जाणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती. त्यासाठी त्यांनी ही जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्यावर दिल्याचे बोलले जात आहे.