नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्यात वाद असल्याचा चर्चा नेहमीच होत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीपासूनच हा वाद सुरू होता. मध्यंतरीच्या काळात हा वाद आधिकच वाढला होता. फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावेळीही पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या वादाला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आज मात्र हा सर्व वाद विसरून या दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून नाशिक येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे येथे उपस्थित अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बराच वेळ चर्चाही सुरू होती.
भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय सुरू आहे. निर्णयही घेतले जात आहे. आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही असा निर्धार करण्यात आला आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, की राज्यात भारतीय जनता पार्टीची नियमानुसार कार्यकारिणी आता अस्तित्वात आली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी अपेक्षा तयार होत आहे. आपण चांगले काम करून नागरिकांपर्यंत जाता येते विकासकामे करता येतात, ही भावना निर्माण झाली. त्यामुळे नक्कीच सरकारने जे निर्णय घेतले त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचे चर्चा होत्या. मात्र आजच्या प्रसंगानंतर पंकजा मुंडे यांना भाजप पक्ष मोठी जबाबदारी देणार असेही बोलले जात आहे.