मुंबई : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असतानाच आज शरद पवारांच्या एका वक्त्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला आहे. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. आमची जमीन आम्हाला माहीत आहे, हवेत नेमकं कोण आहे?, हे तपासावं लागेल असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन.. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत, अशा शब्दात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
फडणवीस यांचं पवारांना प्रत्युत्तर
आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे”, असा सल्ला फडणवीसांनी शरद पवारांना दिला आहे
सामना हा काही पेपर नाही
दरम्यान, सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर फडणवीस म्हणाले, सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही, असं ते म्हणाले.