अहमदनगर : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारसाठी फिल्डिंग लावली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अर्जही दाखल केला मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.
धनंजय जाधव हे एके काळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत म्हणून समजले जात होते. त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून नगरसेविका आहेत. मात्र आता ते विखे गटात आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केली होती. मात्र जाधव यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती.
आज सकाळपासून जाधव यांना भाजपने उमेदवारी दिल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकमध्ये गेलेल्या जाधवांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतला. दाखल करताना एबी फॉर्म मात्र मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी भाजपकडून एबी फॉर्म विनाच उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अपक्ष म्हणूनही एक उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस 16 जानेवारी आहे.