Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडमधील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्याशी असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रीपद गेले. मुंडेंच्या अडचणीत आता नव्याने भर पडलीय. कारण त्यांच्यावर एका महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. रंजना नागपूरकर (Ranjana Nagpurkar) असं त्या महिलेचे नाव आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय ते सविस्तर आपण जाणून घेऊया..
तर तुला जिवंत गाडून टाकू महिलेला दिला इशारा
आपल्या पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले कैलास फड व निखिल फड यांनी आपल्याकडे 17 लाख रुपये मागितले. त्यानंतर मी परळीत धनंजय मुंडे यांच्या घरी गेले. त्यावेळेस धनंजय मुंडे हे देखील घरीच होते, असा दावा रंजना नागपूरकर यांनी केलाय. मात्र चकरा मारूनही आपलं काम होत नसल्याने त्या वैतागल्या. दरम्यान पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिला पैशाच्या मागणीसाठी धनंजय मुंडे यांच्या घरी गेली असता त्यांच्या घरी निखिल फड, कैलास फड व धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. मात्र त्यांच्या समर्थकांकडून धनंजय मुंडे समोरच माझ्या गळ्याला बंदूक लावून मला धमकाविले, तसेच पैसे भेटणार नाही असे देखील त्यांनी सांगितले. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पीडित महिलेने केलाय.
मोठे मोठे गार केले गंमतमधी…कैलास फड
ही महिला खोटा आरोप करत असल्याचे कैलास फड यांनी म्हटलंय. आम्ही कसलेही पैसे घेतले नसल्याचे देखील ते म्हणतात. फड यांनी फेसबुकवरती एक आक्रमक पोस्ट टाकलीय. मोठे मोठे गार केले गमतीमधी, हाताने कपडे फाडून झाले चौकामध्ये, नागपूरची सुपारी कोणी दिली याचा शोध लागला पाहिजे रंजना नागपूरकर लवकर चौकशीला तयार राहा जशास तसे उत्तर दिले जातील, आता संयम संपला अशा शब्दात फड यांनी संबंधित महिलेला इशारा देखील दिला आहे.
पीडित महिलेने घेतली जरांगेंची भेट
आता या प्रकरणांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी मारलीय. रंजना नागपूरकर यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. त्यांना याबाबत कल्पना दिली तसेच रंजना नागपूरकर यांच्या पतीच्या मृत्यूला देखील धनंजय मुंडे हे जबाबदार असल्याचे आरोपही जरांगे यांनी केलाय. यातच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला तर सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंडे समर्थकांकडून आरोपांचे खंडन
धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “महाराष्ट्रात अनेक लोक मुंडे साहेबांचे नाव वापरून स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न करतात. रंजनाताईंनी जर कोणाला पैसे दिले असतील, तर ते साहेबांना दिलेले नसतील. त्यांनी बीडला येऊन प्रत्यक्ष चर्चा करावी, आम्ही या प्रकरणातील सत्य शोधण्यास तयार आहोत, अशी भूमिका नाईकवडे यांनी मांडली आहे.
