काका-पुतण्यांमधील संघर्ष हा बीड जिल्ह्याला नवीन नाही. गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित-अमरसिंह पंडित या काका-पुतण्यांमध्ये उभा संघर्ष राहिला आहे. एका बाजूला हे चित्र असतानाच दुसऱ्या बाजूला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी पुतण्यासाठी स्वतःच्या राजकारणाला ब्रेक लावला आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकच लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपल्या दोन्ही मुलांना बाजूला सारत पुतण्या जयसिंह सोळंके (Jaisinha Solanke ) यांचे नाव त्यांनी राजकीय वारसदार म्हणून पुढे केले आहे. आता आगामी निवडणुकीत प्रकाश सोळंके यांचा हा वारसदार किती यशस्वी ठरणार? मुळात जयसिंह सोळंकेंना अजित पवार (Ajit Pawar) तिकीट देणार का? की ऐनवेळी भाजपच्या नेत्याला पक्षात घेऊन उमेदवारी देणार? (Dhananjay Munde will nominate Ramesh Adsakar from NCP instead of Jaisingh Solanke in Majalgaon Assembly Constituency)
माजलगाव मतदारसंघात कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. पण 1999 मध्ये काँग्रेसमध्ये असलेले प्रकाश सोळंके भाजपबरोबर गेले आणि पहिल्यांदा आमदार झाले. 1995 ला अपक्ष निवडून आलेल्या आणि राष्ट्रवादीचे तिकीटावर रिंगणात उतरलेल्या बाजीराव जगताप यांचा त्यांनी मोठा पराभव केला. सोळंके यांना 67 हजार 303 मते मिळाली होती. तर बाजीराव जगताप यांना 39 हजार 436 मते मिळाली होती.
2004 ची विधानसभाही सोळंके यांनी भाजपच्या तिकीटावर सहज जिंकली. त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगताप यांचा पराभव केला. सोळंके यांना तब्बल 71 हजार 937 मते होती. तर बाजीराव जगताप यांना 36 हजार 907 मते होती. 2009 ला सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. पण निवडणुकीत सोळंके विजयासाठी संघर्ष करावा लागला. भाजपचे आर. टी. देशमुख यांनी सोळंके यांना चांगलाच घाम फोडला. अखेरच्या क्षणी सोळंके हे आठ हजार मतांनी निवडून आले.
त्यानंतर 2014 ची निवडणूक अटीतटीची झाली. आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सोळंके यांना भाजपच्या आर. टी. देशमुख यांनी मोठा झटका दिला. सोळंके हे तब्बल 37 हजार मतांनी पराभूत झाले. देशमुख यांनी तब्बल 1 लाख 12 हजार 497 मते घेतली होती. तर सोळंके यांना 75 हजार 252 मते मिळाली होती. 2019 ला प्रकाश सोळंके यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारकी मिळविली. त्यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा तेरा हजार मतांनी पराभव केला. सोळंके यांना एक लाख 11 हजार 566 मते मिळाली होती. तर आडसकर यांना 98 हजार 676 मते मिळाली होती.
मागच्या पाच वर्षात मतदारसंघातील राजकारण कमालीचे बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाबरोबर गेले. अशातच मराठा आरक्षण मागणीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. त्या निवडणुकीपूर्वी प्रकाश सोळंके यांचे घर आंदोलकांनी पेटवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत रमेश आडसकर, सोळंके असे स्थानिक नेते पाठिशी असताना पंकजा मुंडे यांना येथून अवघे 947 मतांचे मताधिक्य मिळाले. बजरंग सोनवणे यांना 1 लाख 4 हजार 713 मते मिळाली होती. तर पंकजा मुंडे यांना 1 लाख 5 हजार 648 मते मिळाली होती.
आता प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर करत पुतण्या जयसिंह सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून जाहीर केले आहे. पण जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपची मोठी ताकद आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून जयसिंह सोळंके हे निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्याचबरोबर ते स्थानिक राजकारणात जोरदार सक्रीय आहेत. धारूर पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती ते राहिलेले आहे. त्यांचा तगडा जनसंपर्क आहेत.
तर भाजपकडून रमेश आडसकरही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पण त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. मात्र जयसिंह सोळंके यांचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह गेल्यास रमेश आडसकर यांना अजित पवार गटात घेऊन त्यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. स्थानिक पत्रकारांच्या मते रमेश आडसकर यांना पक्षात घेण्यासाठी स्वत: कृषीमंत्री धनंजय मुंडे अनुकूल आहेत. तसे झाल्यास जयसिंह सोळंके यांना आडसकर यांचे काम करणे किंवा बंडखोरी करणे हे दोन पर्याय असणार आहे. तर तिसरा पर्याय आहे. तो म्हणजे दोघांपैकी एकाला तिकीट मिळाले तरी एक जण शरद पवार यांचा गटाकडे जाऊ शकते.
महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाईल हे निश्चित आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाची म्हणावी तशी ताकद नाही. शरद पवार गटाकडून माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार गोविंदराव डक यांचा मुलगा नारायण डक, गंगाभिषण थावरे असे तिघे जण इच्छुक आहेत. या तिघांपैकी एकाची निवड शरद पवारांकडून केली जाऊ शकते. याशिवाय राजकीय ताकद बघून सोळंके किंवा आडसकर यांनाही पक्षात घेतले जाऊ शकते. सध्याची शरद पवारांची रणनिती बघता त्यासाठी पवार नक्कीच तयार होतील. त्यामुळे माजलगावची निवडणूक यंदा भलतीच चुरशीची होईल हे नक्की.