Download App

Ground Zero : आष्टीत धस, धोंडे अन् आजबेंनाही ‘जरांगे फॅक्टर’चा धसका!

आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.

  • Written By: Last Updated:

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा इफेक्ट भाजपसाठी (BJP) डेंजर ठरला. मराठा (Maratha) विरुद्ध ओबीसी (OBC) या वादाने वातावरण ढवळून निघाले अन् पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला. श्वास रोखणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) अवघ्या सहा हजार मतांनी निवडून आले. मुंडे यांच्या याच पराभवात आणि सोनवणे यांच्या विजयात सगळ्या मोठा हातभार लागला तो आष्टी विधानसभा मतदारसंघाचा.

गतवेळी राष्ट्रवादी पक्ष सोबत नसतानाही प्रितम मुंडे यांना इथून 70 हजारांचे मताधिक्य होते. यंदा मंत्री धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे असे सगळे सोबत असल्याने पंकजा मुंडे यांना एक लाखांपेक्षा जास्त किंवा किमान तेवढ्याच मतांची अपेक्षा होती. पण आष्टीमधून पंकजा मुंडे यांना 32 हजार 254 मतांचे मताधिक्य मिळाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. बजरंग सोनवणे यांना येथे चांगली मते मिळाली. भरवशाच्या मतदारसंघातूनच लीड घटल्याने पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता आष्टीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळेच महायुतीचे प्रमुख आणि इच्छुक काहीसे टेन्शनमध्ये आहेत.

पण जे लोकसभेला झाले ते विधानसभेला टाळण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. मात्र विद्यमान आमदार आणि दोन्ही इच्छुक माजी आमदार युतीतच आहेत. त्यामुळे मतदारसंघ नेमका कोणाला सुटणार आणि अन्य दोघांना कसे थांबवणार? यातील कोणी बंडखोरी केली तर काय? त्याचे काय परिणाम होणार? याचे वेगळेच टेन्शन आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतून शरद पवार हे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. बजरंग सोनवणे हे खासदार झाल्याने त्यांच्याही नेटवर्कचा इथे शरद पवार यांना उपयोग होऊ शकतो. शिवाय जरांगे इफेक्टचाही महाविकास आघाडीला फायदा होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक चुरशीची होईल असे दिसते. (In Ashti Assembly Constituency, there will be a fight between NCP and ncp Sharad Chandra Pawar’s party)

लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहु आष्टी मतदारसंघातील सद्यस्थिती आणि कोण असू शकतात उमेदवार?

आष्टी, पाटोदा तालुका आणि शिरुर तालुक्याचा काही भाग असा भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा असा हा मतदारसंघ. दुष्काळी भाग असल्याने शेतीसाठी पाण्याचा विचारच इथे होऊ शकत नाही. त्यामुळे राज्याला शेत मजूर आणि ऊस तोड कामगार पुरविणारा तालुका अशी या मतदारसंघाची ओळख. अशा या मतदारसंघावर एखादा-दुसरा अपवाद वगळता भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांचेच वर्चस्व राहिले आहे. पण पक्ष मात्र वेगळे राहिले. 1980 मध्ये चंद्रकांत आजबे यांना पराभूत करत भीमराव धोंडे हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 1985 आणि 1990 असे दोन टर्म काँग्रेसकडून आणि 2014 मध्ये एक टर्म भाजपकडून आमदार झाले. 1995 मध्ये साहेबराव दरेकर हे अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यानंतर सुरु झाला सुरेश धस यांचा बोलबाला. धस हे 1999, 2004 आणि 2009 असे तीन वेळा आमदार झाले. यात सुरुवातीचे दोनवेळा भाजप आणि एक वेळा राष्ट्रवादीकडून विधानसभेवर गेले. त्यानंतर ते एकदा विधान परिषदेवरही गेले.

अलिकडील तीन निवडणुकींचे गणित समजून घ्यायचे तर 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस हे रिंगणात होते. त्यांच्याविरोधात भाजपने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिली होती. पण धस हे 24 हजार मतांनी विजयी झाले. 2014 मध्ये भाजपच्या भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात फाईट झाली. यात धोंडे यांनी 1 लाख 20 हजार मते घेत धस यांचा अवघ्या सहा हजार मतांनी पराभव केला. धस पराभूत झाल्यानंतर त्यांनी पु्न्हा भाजपची वाट धरली. पंकजा मुंडे यांचा त्यांना भाजपमध्ये आणण्याचा मोठा रोल होता. त्यानंतर ते बीड-धाराशिव-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. अशा पद्धतीने धोंडे आणि धस दोघेही राजकीय विरोधक एकाच पक्षाकडून आमदार राहिले.

भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग… शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?

पण 2019 मध्ये एवढे नेते एकाच पक्षात असल्याचा भाजपला फायदा होण्याऐवजी तोटाच झाला आणि बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपने भीमराव धोंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने बाळासाहेब आजबे यांना रिंगणात उतरविले. आजबे यांना राजकीय पार्श्वभूमी होती. त्यांचे वडिल भाऊसाहेब आजबे या मतदारसंघातून 1962 मध्ये आमदार होते. बाळासाहेब आजबे यांनी भीमराव धोंडे यांचा तब्बल 26 हजार मतांनी पराभव केला. त्यांनी तब्बल 57 वर्षानंतर घरात आमदारकी आणली. आता आजबे यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पुन्हा एकदा अशीच स्थिती तयार झाली आहे. भीमराव धोंडे आणि सुरेश धस हे भाजपमध्येच इच्छुक असताना आमदार आजबेही युतीतच आले आहेत. त्यामुळे आष्टी तालुक्यात एका म्यानात तीन तलवारी अशी स्थिती तयार झाली आहे.

आजबे महायुतीत आल्याने ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ या सुत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपकडून तयारी करणाऱ्या धोंडे आणि धस यांची कोंडी झाली आहे. या दोघांना भाजप कसे शांत हा प्रश्न आहे. या दोघांपैकी एकाला भविष्यात विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला तरी एक जणांचा राजकीय प्रश्न निर्माण होतो, अशा परिस्थितीत कोण बंड करणार का? हे सगळे एका पक्षात राहतील का? हा प्रश्न आहे. शिवाय एकत्र राहिले तरी धस आणि धोंडे आजबेंचे काम करतील का? हा प्रश्न आहे.

Ground Zero : विवेक कोल्हे तुतारी फुंकणार? काळेंना घेरण्यासाठी पवारांचा डाव

महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसची ताकद या ना के बराबर आहे. स्थानिक पातळीवर शरद पवार इथून नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे. राम खाडे या ओबीसी चेहऱ्याला त्यांच्याकडून रिंगणात उतरवले जाऊ शकते. डॉ. महेश थोरवे, उद्धव दरेकर हे नवीन चेहरेही स्पर्धेत आहेत. तर माजी आमदार साहेबराव दरेकरही इच्छुक आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होऊ शकते. या विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील यांच्याकडूनही उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा आहे. जरांगेंच्या आंदोलनात अग्रेसर असलेले अंभोऱ्याचे सरपंच सागर आमले हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ यंदा प्रचंड प्रमाणात गाजणार आहे. मतांच्या विभागणीमध्ये अपक्षांची लॉटरी लागते हे दोनदा मतदारसंघाने दाखवून दिलेले आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात हॉयव्होल्टेज सामना होणार हे नक्की.

आष्टी तालुक्यात सतत पाणी टंचाईसाठी उपाययोजना काहीच नाही. मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. कुकडी प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात आष्टीचाही समावेश आहे. परंतु नगर आणि सोलापूरलाच कधी सिंचन क्षेत्राच्या प्रमाणात आणि वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या वर्षानुवर्षाच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आष्टीपर्यंत पाणी कधी पोहोचणार या प्रश्नाचे उत्तर कोणताही लोकप्रतिनिधी देताना दिसत नाही. स्वाभाविकच पाणी नसल्याने मोठे औद्योगिक प्रकल्प या भागात उभे राहिले नाहीत. त्यामुळे युवकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या तालुक्याच्या गावाला सुसज्ज स्टेडियम नाही. यामुळे खेळाडूंना सराव करणे अवघड होऊन बसले आहे. मतदारसंघातील रस्त्त्यांचाही प्रश्न आहे.

follow us