2014 च्या लोकसभा निवडणुकीत 74 हजारांचे मताधिक्य, 2019 मध्ये 80 हजारांचे मताधिक्य, 2014 आणि 2019 या दोन्ही टर्मला भाजपचेच (BJP) आमदार. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही (Lok Sabha Election) कांद्यावरील निर्यातबंदीने दिंडोरी मतदारसंघात (Dindori Lok Sabha) भाजपची फ्या फ्या झाली. येवला, दिंडोरी, निफाड इतकचं काय भाजपच्या उमेदवार भारती पवार (Bharati Pawar) यांचा घरचा मतदारसंघ असलेल्या कळवणमध्येही त्या पिछाडीवर पडल्या. पण चांदवड मतदारसंघातून (Chandwad assembly constituency) मात्र भाजपलाच आघाडी मिळाली. थोडक्यात चांदवड मतदारसंघाने बहुतांशवेळी भाजपचीच साथ दिली आहे. भाजपसाठी हा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. पण यंदा इथून काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना विजयाची संधी दिसू लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांनी भाजपची चिंता वाढवली आहे. (fight between Rahul Aher of BJP and Shirish Kotwal of Congress in Chandwad assembly constituency?)
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूया नेमकी काय समीकरणे बदलली आहेत, भाजपची चिंता का वाढली आहे आणि शिरीष कोतवाल यांना विजयाची कशी संधी दिसत आहे…
मगाशी म्हंटल्याप्रमाणे चांदवड-देवळा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1985 साली जयचंद कासलीवाल यांनी पहिल्यांदा हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला. त्यानंतर 1990 आणि 1995 या निवडणुकीतही कासलीवाल विजयी झाले. 1999 मध्ये मात्र त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मूळचे काँग्रेसी असलेल्या शिरीष कोतवाल यांनी नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2004 च्या निवडणुकीत मात्र कोतवाल यांना धक्का बसला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तमबाबा भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत विजयही संपादन केला. तर शिवसेनेकडून लढलेल्या कोतवाल यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला.
2009 च्या निवडणुकीतही बऱ्याच घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उत्तमबाबा भालेराव यांना उमेदवारी मिळाली तर शिरीष कोतवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. 2009 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतही चांदवडमधील मतदार संमीश्र मतदान करायचे. पण 2014 नंतर समीकरणे बदलली.मोदी लाटेत चांदवडमधील जनतेने कौल बदलला. लोकसभेला भाजपचे उमेदवार असलेल्या हरिशचंद्र चव्हाण यांना तब्बल 74 हजारांचे लीड मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत इथे माजी मंत्री दौलतराव आहेर यांच्या मुलाची म्हणजेच राहुल आहेर यांची एन्ट्री झाली. मिळालेले लीड पाहुन भाजपसाठी हा मतदारसंघ सेफ मानला जाऊ लागला. आहेर यांनाही इथून सहज विजय मिळाला. त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आत्माराम कुंभार्डे यांनी बंडखोरी केली. त्यांनी नाही म्हणायला 27 हजार मते घेतली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपच्या भारती पवार यांना तब्बल 80 हजार मतांचे दान मिळाले. याच मतांमुळे पवार यांचा विजय सुकर झाला होता. विधानसभेलाही कोतवाल आणि भालेराव एकत्र असून राहुल आहेर यांनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. कोतवाल यांचा पुन्हा पराभव झाला. सलग दोनवेळा झालेल्या पराभवाने एखादा उमेदवार खचून जातो, संन्यासाचा विचार करतो. पण कोतवाल यांनी हार मानलेली नाही. त्यांनी लढा सुरुच ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनापासून आघाडीचे काम केले. कांदा प्रश्नी आंदोलन करणे, राहुल आहेर यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती करणे अशातून त्यांनी मतदारसंघात वातावरण तापवले. नाराज शेतकऱ्यांची नस कोतवाल यांनी बरोबर पकडली.
शरद पवार यांनी देखील सलग दोनदा कांद्याच्या प्रश्नावरुन आंदोलन केले. राहुल गांधी यांनीही इथे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासह महामार्ग रोखला होता, जाहीर सभा घेतली होती. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांची सहानुभूती महाविकास आघाडीच्या बाजूने फिरली. भारती पवार यांना ज्या मतदारसंघाने खासदार केले होते, त्याच मतदारसंघात आता त्यांचे लीड अवघ्या 17 हजारांवर आले आहे. दिंडोरी मतदारसंघात महायुतीची झालेली ही अवस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कांदा निर्यात बंदी करणे चूक होती अशी कबुलीच दिली. आता राहुल आहेर यांचे मतदारसंघाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शिरीष कोतवाल यांना यंदा चांदवडमध्ये संधी दिसून येत आहे.
राहुल आहेर हे तिकीट कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच असणार. मात्र इथे त्यांना माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा विरोध होऊ शकतो. केदा आहेर हे देवळा तालुक्यातील असून इथे त्यांचे मोठे वर्चस्व आहे. ते यंदा विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. देवळा नगरपरिषद, देवळा तालुक्यातील जवळपास 80 टक्के ग्रामपंचायत या त्यांनी त्यांच्या नेतृत्वात काबीज केल्या आहेत. नुकतेच लोकसभेला भारती पवार यांना मिळालेले 17 हजारांचे लीड हेही देवळा तालुक्यातूनच आहे. तसे आमदार राहुल आहेर हेही दोन्ही वेळा देवळा तालुक्यातूनच लीडवर होते. मात्र यंदा केदा यांचे पारडे जड दिसून येते.
याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे आक्रमक नेते अशी ओळख असलेले गणेश निंबाळकर हे देखील विधानसभेसाठी तयारी करत आहेत. गणेश निंबाळकर यांनी कांदा प्रश्नावर मोठे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची सहानुभूती त्यांनाही मोठ्या प्रमाणावर मिळू शकते. पण सध्या तरी भाजपसाठी घटलेले मताधिक्य हा चिंतेचा विषय बनला आहे. तर शिरीष कोतवाल यांच्यासाठी तिसऱ्यांदा निवडून जाण्यासाठीची संधी तयार झाली आहे