धुळे: नाशिक पदवीधर निवडणुकीत माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षादेश डावल्याने चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली होती.
यावर धुळ्यात (Dhule) बोलताना सुधीर तांबे म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी (Nana Patole) चर्चा झालीय. त्यांच्या या विधानाने नवा ट्विस्ट निर्माण झालाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा पाठिंबा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना असल्याचं म्हटलं होतं. या प्रश्नावर बोलताना सुधीर तांबे म्हणाले, नाना पटोलेंशी चर्चा झालीय.
काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आल्यानंतर धुळ्यात माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुधीर तांबे यांनी विधानपरिषद निवडणुकीला काँग्रेसकडून अर्ज न दाखल केल्यानं चौकशी होईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर तांबे धुळ्यात आले होते. शहरातील शिक्षक भवन येथे कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, मी पुन्हा एकदा सांगतो मी असो अथवा सत्यजीत असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. ठीक आहे राजकारण असतं, राजकारणात काही डावपेच चालू राहतात.
आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतात इकडची काडी तिकडे केली त्यामुळे ते जोडलं नाही. त्यामुळे ते चिटकलं नाही. डावपेच हा राजकारणाचा भाग असतो. आपल्याला काही गोष्टी अचानक पणे घडल्याचं वाटतं.
परंतु, त्या ठिकाणी आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. आपण आणि सत्यजीतने काहीही चुकीचं केलेलं नसल्याचे म्हणत, मतदारांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही यावेळी सुधीर तांबे यांनी दिली.
सुधीर तांबे यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याच्या विधानामुळे, काँग्रेस पक्षाच्या निलंबनानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का? हाच महत्त्वाचा प्रश्न यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे.